अमरावतीत बनावट सिमेंटचा मोठा भंडाफोड

तीन गोदामांवर छापे; दोन आरोपी अटकेत

-नकली सिमेंटच्या 2 हजारांवर गोण्या जप्त
-आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता
अमरावती / 31 जुलै : शहरात बनावट सिमेंट बनवणार्‍या टोळीवर अमरावती गुन्हे शाखा युनिट 1 ने मोठी कारवाई केली आहे. मसूद शिवार, कांट आमला शिवार (बडनेरा) आणि नवसारी (गाडगे नगर) येथील गोदामांवर एकाच वेळी छापे टाकून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून 1500 ते 2000 बनावट सिमेंटच्या गोण्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या सिमेंटला ‘रोहतक’ ब्रँडची लेबले लावून स्थानिक बाजारपेठेत व परजिल्ह्यात विक्री केली जात होती.
अटक करण्यात आलेले आरोपी बनावट सिमेंट तयार करून त्याचे पॅकेजिंग रोहतक ब्रँडच्या गोण्यांमध्ये करत असत. या सिमेंटचा पुरवठा शहरातील लहान किरकोळ दुकानदारांपासून ते मोठ्या होलसेल व्यापार्‍यांपर्यंत केला जात होता. बनावट सिमेंटचा उपयोग बांधकामामध्ये झाल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. गुन्हे शाखेला या प्रकाराबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पथक तयार करण्यात आले. विशेष पथकाने मसूद शिवार, कांट आमला शिवार आणि नवसारी अशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करत आरोपींना रंगेहात पकडले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले आहे की, या कारभारात आणखी काही लोकांचा सहभाग असू शकतो. बनावट सिमेंटचे उत्पादन, पॅकेजिंग व वितरण ही साखळी पद्धतीने राबवली जात होती. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला असून अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी चौकशी सुरू आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना गुन्हे शाखा युनिट 1 च्या अधिकार्‍यांनी सांगितले की, बनावट माल तयार करून जनतेच्या जिवाशी खेळ करणार्‍यांविरुद्ध आम्ही कठोर कारवाई करू. हे प्रकार सहन केले जाणार नाहीत. या प्रकरणात सामील असलेल्या प्रत्येक आरोपीला गजाआड केले जाईल.

संबंधित बातम्या

Back to top button