उपअधीक्षक नेमाडे व भूमापक गोळे लाच घेताना जाळ्यात
50 हजार स्विकारताना रंगेहात अटक

-भूमी अभिलेखमध्ये एसीबीचा मोठा सापळा
अमरावती / 31 जुलै : अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयात आज (31 जुलै) दुपारी भ्रष्टाचार विरोधी विभागाने (एसबी) मोठा सापळा यशस्वी केला. उपअधीक्षक अनिल पांडुरंग नेमाडे आणि नगर परीक्षण भूमापक चंद्रशेखर पुंडलिक गोले या दोघांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीच्या या कारवाईनंतर संपूर्ण भूमी अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणातील तक्रारकर्त्याचा मुलगा परदेशात वास्तव्यास असून, त्याचे घर कॅम्प परिसरातील नवजीवन कॉलनीत आहे. त्या मुलाने आपल्या वडिलांना म्हणजेच तक्रारदारास घराचा मुखत्यार पत्र दिला होता. त्याअंतर्गत त्यांनी संबंधित घराच्या फेरफारासाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या फेरफार प्रक्रियेसाठी उपअधीक्षक अनिल नेमाडे व भूमापक चंद्रशेखर गोले यांनी तक्रारदाराकडे एक लाख पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली. नंतर ही रक्कम 50 हजार रुपयांवर आणून सेटल करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे तक्रारदाराने थेट भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर 30 जुलै रोजी एसीबीने प्राथमिक चौकशी केली. खात्री पटल्यावर 31 जुलै रोजी सकाळपासूनच भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने 50 हजार रुपये दिले असताना, एसीबीच्या पथकाने दोघा अधिकार्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोघांविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक मारोती जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगिता ठाकरे यांच्या नेतृत्वात पीआय ज्ञानोबा फड, पोकां युवराज राठोड, आशीष जांभोले, वैभव जायले, उपेंद्र थोरात व विनोद घुले यांच्या पथकाने केली.




