मोर्शीत मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा भूमिपूजन सोहळा रविवारी
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिलान्यास

-265 कोटी रुपयांचा प्रकल्प
मोर्शी / 31 जुलै : महाराष्ट्रातील चौथे व पश्चिम विदर्भातील पहिले शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय मोर्शी येथील अप्पर वर्धा वसाहतीत साकारले जाणार आहे. सुमारे 265 कोटी रुपये खर्चाच्या या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार, 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.
या सोहळ्यास राज्याचे अनेक मंत्री व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून, यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे आणि राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांचा समावेश आहे. महाविद्यालयासाठी लागणारी 4.08 हेक्टर जागा जलसंपदा विभागाकडून नागपूरच्या पशू व मत्स्य विद्यापीठाला हस्तांतरित करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोई समाजातील नागरिकांनी तसेच मोर्शी-वरूड मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आ. उमेश यावलकर यांनी केले आहे.




