अमरावतीत हॉकर्स झोनसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियोजन

-पाचही झोनसाठी संभाव्य जागांची निवड
-बैठकीत ठरले अनेक निर्णय
अमरावती / 31 जुलै : अमरावती शहरात रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेला आळा बसावा, तसेच फेरीवाल्यांना अधिकृतपणे व्यवसायाची संधी मिळावी, यासाठी महानगरपालिकेने हॉकर्स झोन स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या मुख्य कार्यालयात आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली एक सविस्तर व नियोजनात्मक बैठक पार पडली.
या बैठकीत शहरातील सर्व पाच झोनमध्ये हॉकर्स झोन तयार करण्यासाठी संभाव्य जागांची निवड करण्यात आली. नगररचना, अतिक्रमण नियंत्रण, बाजार परवाना व अन्य संबंधित विभागांनी प्रत्येक झोनसाठी सादरीकरण (प्रेझेंटेशन) सादर करताना हॉकर्स झोनसाठी योग्य जागा सुचविल्या. या जागांवर पायाभूत सुविधा देऊन फेरीवाल्यांना अधिकृतपणे व्यवसाय करता येईल, असे नियोजनही बैठकीत करण्यात आले. शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात ठोस आणि नियोजनबद्ध कारवाई केली जाईल. मात्र त्यांना अधिकृतपणे व्यवसाय करण्याची संधी देणं ही आपली जबाबदारी आहे, असे आयुक्त सौम्या शर्मा यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले.
प्रत्येक झोनने संभाव्य जागांचे तातडीने प्रेझेंटेशन सादर करावे, हॉकर्स झोनसाठी पाणी, वीज, स्वच्छता व सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवाव्यात, वाहतूक व पादचारी मार्ग यांना कोणताही अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांची यादी तयार करून त्यांना नोटीस बजावाव्यात, नोटीस देऊनही व्यवसाय सुरू ठेवणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, संपूर्ण अंमलबजावणी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पाडावी आणि प्रत्येक टप्प्यावर प्रगती अहवाल सादर करावा, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाढत्या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी, पादचार्यांसाठी अडथळा आणि अस्वच्छतेच्या तक्रारी वाढल्या होत्या. नियोजित हॉकर्स झोनमुळे हे सर्व प्रश्न दूर होणार असून, फेरीवाल्यांनाही सन्मानपूर्वक व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, डॉ. मेघना वासनकर, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, दीपक खडेकार, नंदकिशोर तिखिले, नितीन बोबडे, धनंजय शिंदे, प्रमोद इंगोले, श्रीरंग तायडे, विवेक देशमुख, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे तसेच मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-नागरिक आणि फेरीवाल्यांना आवाहन
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहरातील फेरीवाल्यांना आवाहन केले की, आपला व्यवसाय अधिकृत हॉकर्स झोनमध्येच करा. अनधिकृत ठिकाणी व्यवसाय टाळा, अन्यथा कठोर कारवाई होणार आहे. तसेच नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, अनधिकृत फेरीवाल्यांकडून खरेदी करताना काळजी घ्या. आपण सर्वजण मिळून एक स्वच्छ, अतिक्रमणमुक्त व सुरक्षित अमरावती घडवूया.




