आज ‘सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कारा’चे वितरण

‘वसा’ संस्था सन्मानित होणार

अमरावती / 31 जुलै : समाजसेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा ‘सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कार’ यावर्षी ‘वसा कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन, अमरावती’ या संस्थेला जाहीर झाला असून, 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता हा पुरस्कार अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. कार्यक्रम श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर पुसतकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘वनराई’चे विश्वस्त गिरीश गांधी हे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून ऑड. आर. बी. अटल (गोरक्षण व हिंदू स्मशानभूमी ट्रस्टचे अध्यक्ष) आणि अविनाश कोठाळे (जिजाऊ बँकेचे अध्यक्ष) उपस्थित राहणार आहेत. वर्ष 2008 मध्ये शुभम सायंके, निखिल फुटाण, गणेश अकर्ते व भूषण सायंके या चार तरुणांनी मिळून प्राण्यांसाठी समर्पित भावना ठेवत ‘वसा’ ही संस्था स्थापन केली. संस्था मंगलधाम कॉलनी, छत्री तलावाजवळ, येथे वसलेली आहे. येथे स्थापन करण्यात आलेल्या ‘श्री गोवर्धन पशुवैद्यकीय रुग्णालय’ व प्राणी बचाव केंद्रात जखमी, आजारी, अनाथ व अपंग प्राण्यांवर उपचार केले जातात, त्यांचे पुनर्वसनही केले जाते.
‘वसा’ संस्थेचे कार्यकर्ते दरवर्षी हजारो भटक्या, अनाथ व गरजू प्राण्यांना मदत करतात. आतापर्यंत 25 हजारांहून अधिक प्राणी व पक्ष्यांवर उपचार व पुनर्वसनाचे कार्य संस्थेद्वारे झाले आहे. संस्थेच्या मदतीने प्राण्यांचे लसीकरण, अन्न-औषध, शस्त्रक्रिया, व नवजीवन देणारे उपाय केले जातात. विशेष म्हणजे ही सेवा तिशीच्या आतल्या तरुण कार्यकर्त्यांकडून पूर्ण समर्पणाने केली जाते.
शिवसेना नेते दिवंगत सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी समाजसेवेच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्ती अथवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. पुसतकर यांनी आपल्या आयुष्यात जात, धर्म, विचारधारा, संघटना यांचा भेद न करता समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या स्मृतीतून प्रेरणा घेत हा पुरस्कार लोक फाऊंडेशन, कृषी विकास प्रतिष्ठान आणि सोमेश्वर पुसतकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जातो. 1 लाख रोख रक्कम, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पूरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी हा पुरस्कार नानक रोटी ट्रस्ट (2021), श्री. संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल (2022), रक्तदान समिती (2023) व ‘तपोवन’ संस्था (2024) यांना मिळाला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button