फसवणुकीनं वनरक्षक झाला! प्रदीप सुलाने निलंबित

स्पाय ब्लूटूथ डिव्हाइस वापरून लेखी परीक्षा

-मैदानात डमी उमेदवाराला पळवलं
अमरावती / 30 जुलै : वनरक्षक भरतीत चक्क फसवणूक करून सरकारी नोकरी मिळवणार्‍या प्रदीप बदामसिंह सुलाने (27, रा. नलनीवाडी, ता. भोकरदन, जि. जालना) या वनरक्षकाचा अखेर गंडा उघड झाला असून त्याला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वनविभागात खळबळ माजली आहे.
सन 2018 मध्ये अमरावती वन विभागात वनरक्षक पदासाठी झालेल्या भरतीत सुलानेनं स्वतः परीक्षा न देता स्पाय ब्लूटूथ डिव्हाइसच्या मदतीनं उत्तरं लिहवून घेतली. त्यानंतर मैदानी चाचणीत तर कहर केला. डमी उमेदवाराला धावायला पाठवून स्वतःची जागा भरून काढली. ही धांदली उघडकीस आणण्यासाठी वडाळीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान मैदानी चाचणीचं व्हिडीओ फुटेज तपासण्यात आलं. त्यात स्पष्टपणे दिसून आलं की, धावत असलेला उमेदवार सुलाने नसून दुसराच आहे.
2019 मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस भरतीतही काही गोंधळ उघडकीस आले होते. त्या वेळीही सुलानेचं नाव समोर आलं होतं. तेव्हाच त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर फसवणुकीप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी खझउ कलम 419, 420, 467, 468, 471, 201, 120 (ब), 34 यासह प्रिवेन्शन ऑफ मॉलप्रॅक्टिस अ‍ॅक्ट युनिव्हर्सिटी बोर्ड स्पेसिफाईड एक्झामिनेशन अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर वनविभागाने तातडीने हालचाली करून सुलानेला सेवेतून निलंबित केलं असून, बडतर्फीची प्रक्रिया सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button