अस्वलीचा हल्ला, शेतकरी गंभीर जखमी
मेळघाटात भामदेही शिवारातील घटना

अमरावती / 29 जुलै : चिखलदरा तालुक्यातील भामदेही शिवारात सोमवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. जुबेर शेख (वय 55) असे जखमी शेतकर्याचे नाव असून, त्यांच्या मस्तकावर गंभीर स्वरूपाचा आघात झाला आहे.
ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. जुबेर शेख हे आपल्या शेतामध्ये गुरे चारत असताना पिंपळाच्या झाडावर लपलेल्या अस्वलीने त्यांच्यावर अचानक झडप घातली. हल्ला इतका भयावह होता की अस्वलीने त्यांच्या डोक्याचा काही भाग अक्षरशः ओरबाडला. जखमी अवस्थेतील जुबेर शेख यांना तातडीने चुरणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मसूद खान व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांनी सांगितले की, अस्वलीचा हल्ला दुर्दैवी असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. शासनाच्या नियमानुसार पीडितास मदत देण्यात येईल. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून स्थानिक शेतकर्यांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. भामदेही परिसरात वन्यप्राण्यांचे वाढते दर्शन आणि हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.




