तीन कुख्यात चोर पोलिसांच्या जाळ्यात
गुन्हे शाखा युनिट-1 ची कारवाई

-चोरीचा मुद्देमाल जप्त
अमरावती / 28 जुलै : शहरातील विविध भागांत चोर्यांनी नागरिक हैराण असतानाच गुन्हे शाखा युनिट-1 ने तीन कुख्यात चोरांना अटक करून मोठी कामगिरी केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे गाडगे नगर व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी व चोर्यांमध्ये सक्रिय होते. या आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गजानन अरुण आत्राम (45, रा. अशोक नगर), हेमंत दिगबर पुंड (53, रा. नरेडी नगर) आणि कमल रमेश साहू (32, रा. रतनगंज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी गजानन आत्राम व हेमंत पुंड यांनी गाडगे नगर पोलीस ठाणे हद्दीतील घरांमध्ये चोरी केली होती, तर कमल साहू याने कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 5 मोबाईल, चांदीचे दागिने आदी मुद्देमाल जप्त केला.
गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट-1 ने जाळं टाकत तीनही आरोपींना ताब्यात घेतलं. अधिक तपास सुरू आहे आणि आणखी गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चाचरिया, पोलीस उपयुक्त रमेश धुमाळे, गणेश शिंदे, श्याम धुळे, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील, देवदत्त भंवर व शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात एपीआय मनीष वाकोडे व इमरान नायकवडे, हेकाँ फिरोज खान, सतिश देशमुख, सचिन बहाळे, प्रशांत मोहोड, अलिमुद्दीन खतिब, नजीमुद्दीन सैय्यद, विकास गुडधे, सचिन भोयर, रणजीत गावंडे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, अशोक खंगार व किशोर शेळके आदींनी ही यशस्वी कारवाई केली.




