राज मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
दोघांमध्ये 20-25 मिनिटे चर्चा

-बाळासाहेबांच्या प्रतिमेसमोर ‘फोटो सेशन’
-युतीच्या प्रक्रियेला आणखी बळ
मुंबई / 27 जुलै : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस होता. यानिमित्ताने त्यांचे चुलत बंधू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांची मातोश्री येथे येऊन भेट घेतली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जवळपास 20-25 मिनिटे राज ठाकरे हे मातोश्री येथे होते. यावेळी शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत हे राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मातोश्रीच्या गेटपर्यंत गेले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार वैभव नाईक देखील यावेळी उपस्थित होते.
जवळपास 20 वर्षानंतर राज ठाकरे हे उद्धव यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री येथे आले. एकाच महिन्यातील ही त्यांची दुसरी भेट आहे. याआधी 5 जुलै रोजी वरळी डोम येथील मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्यावर एकत्र आले. तेव्हापासूनच दोन्ही भावांच्या एकत्रिकरणाची आणि त्यांच्या दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा सुरु झाली आहे.
राज ठाकरे यांनी मातोश्री येथे येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांचे अभिष्ठचिंतन केले, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी आज मला खुप आनंद झाला अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यानंतर मातोश्रीमध्ये दोन्ही भावांमध्ये साधारण 20 मिनिटं चर्चा झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर त्यांनी फोटो काढला. दोन्ही भावांमधील भेटी वाढत आहेत, त्यांचे मनोमिलन होत आहे. याबद्दल शिवसैनिकांनी देखली आनंद व्यक्त केला आहे.
सिनिअर ठाकरे बंधू आज सकाळी एकत्र आले आहेत. त्यानंतर ज्युनिअर ठाकरे बंधू अर्थात आमदार आदित्य उद्धव ठाकरे आणि अमित राज ठाकरे हे सुद्धा संध्याकाळी एकत्र आले होते. वरळी येथील पोलीस वसाहत येथील बाप्पाच्या पाद्यपुजन कार्यक्रमात आदित्य आणि अमित ठाकरे सहभागी झाले होते.




