मेळघाटात वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे अवशेष सापडले

बारुखेडाच्या जंगलात आढळली कवटी व हाडे

-बेपत्ता सहकारी हिवरखेडच्या जंगलात गवसला
-कपड्यांवरुन ओळख, घटनास्थळी वाघाचे पगमार्क
धारणी / 25 जुलै : मेळघाटच्या धारणी तालुक्यातील वान आणि कंजोली रेंजअंतर्गत येणार्‍या राणीगांव गोलाईच्या जंगलात एका आदिवासी युवकाची पट्टेदार वाघाने शिकार केल्याची घटना शुक्रवार, 18 जुलै रोजी घडली होती. जवळपास आठवडाभराच्या शोध मोहिमेनंतर वन आणि पोलिस विभागाच्या पथकाला या युवकाच्या शरीराचे अवशेष गोलाई-तलाई परिसरात बारुखेडाच्या जंगलात आढळून आले आहे. वाघाने हल्ला केला तेव्हा त्याचा एक सहकारीही त्याच्यासोबत होता. घाबरुन तो जंगलात पळून गेला होता. त्याचा शोध घेण्यातही यश आले आहे. तो हिवरखेडच्या जंगलात गवसला.
रामसिंग रामचंद्र मावस्कर (35) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे नाव असून तो धारणी तालुक्यातील झिलपी या गावातील रहिवासी होता. वाघाने युवकाची शिकार केल्याच्या या घटनेची पुष्टी करण्यासाठी वनविभागाच्या पथकांकडून दोघांचाही जंगलात शोध घेण्यात येत होता. मात्र त्यांचा कोणताही सुगावा लागत नसल्याने पोलिस आणि वन विभाग हैराण झाले होते. अखेर आज सकाळी हिवरखेडच्या जंगलात आधी रामसिंगचा बेपत्ता सहकारी पोलिसांना आढळूल आला. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस व वन अधिकारी शिकार झालेल्या ठिकाणी बारुखेडाच्या जंगलात पोहोचले. तेथे रामसिंगची कवटी आणि हाता-पायांची काही हाडे सापडली. घटनास्थळावर रामसिंचे फाटलेले कपडे पडले होते. त्यावरुन त्याच्या मित्रानेच ओळख पटविली आणि हे रामसिंगच्याच शरीराचे अवशेष असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी पट्टेदार वाघाच्या पायाचे ठसेही आढळून आले.
झिलपी गावातील रहिवासी असलेला रामसिंग मावस्कर हा 35 वर्षीय युवक आपल्या सालई गावात रहणार्‍या एका साथीदारासह शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वान आणि कंजोली रेंजमधून जनावरे घेउन जात होते. हा परिसर घनदाट जंगलाचा आहे. दरम्यान वाटेत राणीगांव गोलाईच्या जंगल परिसरात अचानक पट्टेदार वाघ त्यांच्यासमोर आला आणि रामसिंग मावस्करवर हल्ला करुन वाघाने त्याची शिकार केली. यावेळी त्याचा सहकारी जीव वाचविण्यासाठी जंगलात पळाला. याबाबत गावकर्‍यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांना शनिवारी सकाळी माहिती दिली.
भिलावेकर यांनी तात्काळ यासंदर्भात धारणीचे पोलिस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण आणि वन विभागाच्या अधिकार्‍यांना अवगत केले. या शिकारीच्या घटनेची माहिती वार्‍याच्या वेगाने सर्वत्र पसरल्याने धारणी तालुक्यात खळबळ उडाली होती. पोलिस आणि वन विभागाच्या पथकांनी राणीगाव गोलाईच्या जंगलात दोन्ही बेपत्ता युवकांचा शोध घेण्याची मोहिम सुरु केली. त्यांचे कुटुंबिय व नातेवाईक तसेच काही ग्रामस्थ या शोधकार्यात सहकार्य करित होते.
ठाणेदार अवतारसिंग चव्हाण आणि मेळघाटातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नेतृत्वात ही शोधमोहिम राबविण्यात आली. त्यांना ग्रामस्थांचीही मदत झाली. आज रामसिंगचे अवशेष आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर माजी आमदार राजकुमार पटेल यांच्यासह काही राजकिय कार्यकर्तेही घटनास्थळी पोहोचले होते. दरम्यान मृतक रामसिंग मावस्कर याच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे निर्देश मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी वन विभागाला दिले आहेत. या घटनेमुळे धारणी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
-आठवडाभरानंतर घटनेवर शिक्कामोर्तब
धारणीपासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर असलेले राणीगाव, गोलाईचे जंगल घनदाट असल्याने वनविभाग आणि पोलिसांना युवकांचा शोध घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर आज आधी रामसिंगचा साथीदार गवसला. तो पोलिस व वन विभागाच्या पथकाला गोलाई-तलई रेल्वेनजीक असलेल्या पुनर्वसित बारुखेडा गावाच्या जंगलात घेउन गेला. याच परिसरात वाघाने रामसिंगची शिकार केल्याचे त्याने सांगितले. येथे शोध घेण्यात आला. तेव्हा वाघाने फडशा पाडल्यानंतर तसेच सोडून दिलेले रामसिंगच्या शरीराचे अवशेष आढळून आले आणि वाघाने युवकाची शिकार केल्याच्या घटनेवर आठवडाभरानंतर शिक्कामोर्तब झाले.

संबंधित बातम्या

Back to top button