तडीपार आरोपींचा शस्त्रांसह शहरातच वावर
गुन्हे शाखेने केली अटक

अमरावती / 25 जुलै : विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याने अमरावती शहरातून तडीपार करण्यात आलेले दोन युवक शहरातच मोकाट फिरत असून ते जवळ प्राणघातक शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट – 2 च्या पथकाने त्यांना शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून दोन चाकू जप्त करण्यात आले आहे. दोघांवरही राजापेठ आणि फ्रेजरपूरा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील महेश कृष्णा खोब्रागडे (वय 22, रा. लुंबिनी नगर) आणि राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील सॅम उर्फ शुभम दिनेश वासनिक (वय 27, रा. नवीन आंबेडकर नगर, बेलपुरा अमरावती) यांच्यावर शहरात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या उपद्रवामुळे महेश खोब्रागडे आणि शुभम वासनिक यांना अमरावती पोलिस आयुक्तालयाने शहरातून तडीपार केले होते. तडीपारीचे आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करुन दोघेही शहरातच वास्तव्यास होते. जवळ चाकू बाळगून दहशत पसरविण्याचाही त्यांचा प्रयत्न होता.
याबाबत आज शुक्रवारी पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट – 2 ला गुप्त माहिती मिळाला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांनाही शिताफीने अटक केली. महेश खोब्रागडेला फ्रेजरपूरा तर शुभम वासनिकला राजापेठ पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले असून त्यांच्यावर तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि जवळ प्राणघातक शस्त्र बाळगण्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे.




