मेळघाटात मुसळधार : अकोट मार्गावर कोसळली दरड

वाहतुक खोळंबली, प्रवाशांनीच मोकळा केला रस्ता

-वाहतुक खोळंबली, प्रवाशांनीच मोकळा केला रस्ता
अमरावती/ 24 जुलै : मेळघाटात मुसळधार पाऊस कोसळत असताना धारणी बिजूधावडी मार्गे आणि हरीसाल, चिखली मार्गे अकोला जिल्ह्यातील अकोटकडं जाणार्‍या मार्गावर कोहा नाका ते बेलकुंड दरम्यान जंगलात दरड कोसळली. यामुळं बुधवारी या मार्गावर एसटी बससह अनेक वाहनं बराच वेळ अडकून पडली होती. यावेळी एसटी बसमधील प्रवाशांसह अन्य वाहनातील लोकांनीच मलबा हटवून हा मार्ग वाहतूकीसाठी मोकळा केला.
मुसळधार पावसामुळं रस्त्यावर दरड कोसळ्यामुळं कोहा नाका ते बेलकुंड मार्गावर वाहनं बराच वेळ अडकली होती. यामुळं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. धारणीवरून अकोट आणि परसापूरला जाणार्‍या डांबरीकरण झालेल्या महामार्गाजवळ डोंगर, झाडं आणि झुडपं आहेत. सोमवारी मध्यरात्रीपासून मेळघाटातील जंगल परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानं अकोट आणि परसापूरला जाणार्‍या रस्त्यावर मोठे दगड आणि झाडं पडली.
वनविभागाच्या कोहा फाटा ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेलकुंड रेस्ट हाऊस दरम्यान रस्त्यावर दरड कोसळली. त्यामुळं रस्त्यावर दगडं आणि मोठ्या प्रमाणात मुरूम पडला होता. बुधवारी सकाळी आठ वाजता धारणीवरून खोंगडामार्गे परसापूर आणि अकोटच्या दिशेनं जाणारी एसटी महामंडळाची बस आणि खासगी वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. दरड कोसळल्यामुळं प्रवासात उशीर होऊ नये म्हणून बसमधील आणि खासगी वाहनातील प्रवाशांनी स्वतः वाहनातून खाली उतरून रस्ता मोकळा केला. यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली.
सध्या मेळघाटात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं मार्गात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे. तेव्हा या भागात प्रवास करणार्‍या प्रवाशांनी सावध प्रवास करावा, असं आवाहन प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

Back to top button