अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रकचालकाचा मृत्यु
मोर्शी तालुक्यात उमरखेडनजीक घटना

मोर्शी / 23 जुलै : ट्रकच्या टायरमधील हवा तपासत असताना 41 वर्षीय युवकाला मागाहून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात युवकाच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यु झाला. मोर्शी तालुक्यातील उमरखेड गावानजीक 21 जुलै रोजी रात्री 1 वाजताचे सुमारास ही घटना घडली. राजू दामू पंदराम (41, रा. सुखी, ता. आठनेर, जि. बैतूल) असे मृतकाचे नाव आहे.
राजू दामू पंदराम हा आठनेर येथील संतोष अनधोरे यांच्या ट्रकवर चालक म्हणून काम करायचा. 21 जुलै रोजी रात्री एक वाजताचे दरम्यान राजू हा बैतुल येथून एमपी 09/ एचएफ 9947 क्रमांकाचा मालवाहू ट्रक घेउन परतवाड्याकडे जात होता. वरुड-मोर्शी मार्गावर उमरखेड गावाच्या वळनावर त्याने चाकातील हवा तपासण्यासाठी आपला ट्रक थांबविला. तो ट्रकमधून खाली उतरलाच होता की, एका अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक देवून घटनास्थळावरून पलायन केले. त्याला मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी राजूला मृत घोषित केले. मोर्शी पोलिसांनी आरोपी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा नोंदविला आहे. उत्तरीय तपासणीनंरत राजुचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.




