मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून 10 लाखांनी गंडविले
दोन महिलांसह 7 जणांवर गुन्हा दाखल

-युवकाची चांदुर रेल्वे पोलिसांत तक्रार
अमरावती / 22 जुलै : मंत्रालयातून सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका युवकाला 10 लाख रुपयांनी गंडविण्यात आल्याची घटना चांदुर रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. यासंदर्भात सचिन महादेव पाटील (27, रा. केळझर, ता. सेलू, जि. वर्धा) या युवकाने चांदुर रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याआधारे पोलिसांनी दोन महिलांसह एकुण 7 आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
सचिन पाटीलच्या तक्रारीनुसार, तो आणि त्याचा मित्र सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करित होता. त्यासाठी सिंदी रेल्वे तालुक्यातील हेलोडी या गावातील रहिवासी असलेल्या विरेंद्र पाटील याने त्यांचा अमरावती येथील एका महिलेसोबत परिचय करुन दिला. ही महिला तुम्हाला नोकरी मिळवून देण्यात मदत करेल, असे त्याने सांगितले होते. या महिलेनेही त्यांना मंत्रालयातून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले आणि त्याकरिता 4 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर या महिलेने अन्य काही लोकांशीही त्यांचा संपर्क साधून दिला. त्यांनीही पैशांची मागणी केली. त्यांच्या बतावणीला बळी पडून सचिन पाटीलने या लोकांना 2 लाख 60 हजार रुपये तर त्याच्या मित्राने 7 लाख 40 हजार असे एकुण 10 लाख 3 हजार रुपये दिले. त्यानंतर या लोकांनी नोकरी लावून देण्याऐवजी सचिन आणि त्याच्या मित्राला टाळणे सुरु केले. फोनवरुनही संपर्क होत नव्हता.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सचिनने यासंदर्भात चांदुर रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी दोन महिला आरोपींसह सुरेश ईश्वर गेडाम आणि ईश्वर गेडाम (दोघेही रा. वाई, चांदुर रेल्वे), राम घाटे (पुलगाव), कदम साहेब नामक व्यक्ती (ठाणे, मुंबई) आणि विरेंद्र पाटील (हेलोडी, सिंदी रेल्वे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.




