अकरावीच्या तिसर्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
रिक्त जागांचा तपशील 23 जुलै येणार

मुंबई / 21 जुलै : अकरावी प्रवेशाच्या दुसर्या फेरीअंतर्गत प्रवेश निश्चित करण्याचा 21 जुलै हा अंतिम दिवस असून, त्यापूर्वीच शिक्षण संचालनालयाने तिसर्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार 21 जुलै रोजी विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग तर 22 ते 23 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना तिसर्या फेरीसाठी अर्जाचा दुसरा भाग भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अकरावीच्या दुसर्या फेरीतील प्रवेशाची मुदत 21 जुलै रोजी संपणार आहे. त्यापूर्वीच शिक्षण संचालनालयाकडून तिसर्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार 21 जुलै रोजी विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करून अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे. तर 22 ते 23 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे. तिसर्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील 23 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
रिक्त जागांचा तपशील जाहीर झाल्यानंतर तिसर्या फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. गुणवत्ता यादीमध्ये जागा जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 26 ते 28 जुलैदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. अकरावी प्रवेशासाठी राज्यातील 9 हजार 469 महाविद्यालयांमध्ये 21 लाख 23 हजार 720 इतक्या जागा उपलब्ध आहेत. यातील 16 लाख 70 हजार 598 नियमित फेर्यांसाठी तर 4 लाख 53 हजार 122 जागा कोट्यांतर्गत प्रवेशासाठी राखीव आहेत.
शिक्षण संचालनालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या फेरीनंतर 5 लाख 8 हजार 96 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये कोट्यांतर्गत 75 हजार 809 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर नियमित फेरीअंतर्गत 4 लाख 32 हजार 287 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तसेच दुसर्या फेरीसाठी 2 लाख 51 हजार 804 विद्यार्थांना जागा जाहीर झाल्या आहेत. यातील आतापर्यंत 1 लाख 70 हजार 458 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामध्ये कोट्यांतर्गत 32 हजार 179 विद्यार्थ्यांनी तर नियमित फेरींतर्गत 1 लाख 38 हजार 279 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.




