पोलिसांना चकमा देवून पळालेला आरोपी पून्हा गजाआड
परतवाडा पोलिसांना चार दिवसांनंतर यश

-चिखलदरा तालुक्यातून अटक
अचलपूर / 21 जुलै : परतवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आणि चौकशीदरम्यान पोलिसांच्या हातून पळून गेलेल्या आरोपीला अखेर चार दिवसांच्या शोध मोहीमीनंतर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी नामदेव बळीराम दहिकर (वय 31 वर्ष) याला आज सोमवार, 21 जुलै रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास मांजरकापडी, ता. चिखलदरा येथून परतवाडा पोलिसांच्या डीबी स्कॉडने ताब्यात घेतले.
नामदेव दहीकरला आपल्या लहान भावावर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात 18 जुलै 2025 रोजी अटक करण्यात आली होती. अचलूपर तालुक्यातील म्हसोना या गावात ही घटना घडली होती. नामदेव दहिकर याला गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या हत्याराच्या शोधासाठी घटनास्थळी नेले जात असताना, त्याने पोलिसांच्या तावडीतून पलायन केले होते. या धक्कादायक घटनेनंतर पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली होती. घटनेनंतर परतवाडा पोलिसांनी तत्काळ तीन स्वतंत्र पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू केले. आरोपी कुठेही जाऊ नये यासाठी परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती आणि विविध भागांत छापे टाकण्यात येत होते.
चार दिवसांच्या तपासानंतर अखेर आज सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास, डीबी स्कॉडने मांजरकापडी गावातून आरोपीला शिताफीने अटक केली. ही अटक परतवाडा पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे. आता आरोपीची सखोल चौकशी करण्यात येत असून, तो चार दिवस कुठे लपून होता, त्याला कुणाची मदत मिळाली का, यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत. आरोपीला न्यायालयासमोर हजर करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही गुन्हेगाराला आश्रय देऊ नये व कोणत्याही संशयास्पद व्यक्तीबद्दल तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. परतवाडा पोलिस स्टेशनच्या कार्यक्षमतेमुळे एक फरार आरोपी पुन्हा गजाआड झाला असून, पोलिसांची ही कारवाई नागरिकांमध्ये विश्वास वाढवणारी ठरली आहे.




