पॅन्टलून्स मॉलमध्ये स्पा सेंटरच्या आडोशाने देहविक्री
6 तरुणी, 3 ग्राहक ताब्यात

-युनिकॉन सेंटरवर गुन्हे शाखेचा छापा
-व्यवस्थापकाला अटक, मालकांवर गुन्हा
अमरावती / 20 जुलै : स्पा सेंटर, फेक वेडिंग पार्टीच्या नावाखाली अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात बिभस्त व अनैतिक कृत्ये केली जात असल्याची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहे. त्यात आता बडनेरा मार्गावर राजापेठ परिसरात सुरु असलेल्या अशाच एका अवैध व्यवसायाची भर पडली आहे. गुन्हे शाखा युनिट – 2 च्या पथकाने पॅन्टलून्स मॉलमधील युनिकॉन स्पा सेंटरवर छापा मारुन तेथे सुरु असलेला देहविक्रीचा गोरखधंदा आज उघडकीस आणला.
यावेळी सहा तरुणींसह तीन ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सेंटरच्या व्यवस्थापकालाही अटक करण्यात आली असून पुणे आणि मुंबई येथील रहिवासी असलेल्या दोन संचालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणी दिल्ली, मुंबई, छ. संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. बडनेरा मार्गावर राजापेठ परिसरात भारतीय महाविद्यालयानजीक पॅन्टलूम्स मॉल आहे. या मॉलमध्ये युनिकॉन स्पा सेंटर हे प्रतिष्ठान आहे. या सेंटरमधूनच स्पासाठी आलेल्या ग्राहकांची तरुणींमार्फत वासनातृप्ती केली जाते, त्यासाठी मोठी रक्कम आकारली जाते, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट-2 ला प्राप्त झाली होती.
त्यावरुन आज सायंकाळी गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रमुख पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण आणि एपीआय महेश इंगोले यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने पॅन्टलूम्स मॉलमध्ये धडक दिली आणि युनिकॉन स्पा सेंटरवर छापा मारला. पोलिसांना यावेळी सेंटरचा व्यवस्थापक संजय भरतविंग राजपूत (24, रा. ललीतपूर, उत्तर प्रदेश) याच्यासह सेंटरमध्ये हजर असलेल्या तरुणी आणि ग्राहकांची चौकशी केली. त्यातून या सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा अवैध व्यवसाय चालत असल्याचे स्पष्ट झाले. काही आक्षेपार्ह साहित्यही पोलिसांना आढळून आले.
त्यानंतर पोलिसांनी व्यवस्थापक संजय भरतसिंग राजपूत याला अटक केली. तसेच मुंबई, दिल्ली आणि छ. संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या सहा युवतींना व तीन ग्राहकांनीही पोलिसांनी ताब्यात घेतले. पॅन्टलूम्स मॉलमध्ये ज्या दुकानात हा अनैतिक व्यवसाय सुरु होता, त्या दुकानाचा मालक सोमेश्वर येवते नामक व्यक्ती असून तो मुंबईचा रहिवासी आहे. सोमेश्वर येवते स्वत: आणि पुणे येथील वैभव नांदरम नामक व्यक्ती असे दोघे भागीदारीत हे सेंटर चालवित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बाहेरगावाहून मुली आणून या सेंटरमध्ये त्यांच्याकडून देहविक्री केली जात होती. सोमेश्वर येवते, वैभव नांदरम या संचालकांसह व्यवस्थापक संजय राजपुत या तिघांवर राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.




