भेलचे संचालक रमेश मावस्करांना राष्ट्रपती भवनाचे निमंत्रण
मेळघाटातील समस्या व वैशिष्टे मांडणार

-राष्ट्रपतींसोबत संवाद बैठकीत सहभाग
अमरावती / 20 जुलै : मेळघाटातील समस्या व वैशिष्ट्यांची माहिती जाणून घेण्यासाठी मेळघाटच्या इतिहासात पहिल्यांदाच भेलचे संचालक तथा भाजप प्रदेश सदस्य रमेश मावसकर यांना राष्ट्रपती भवनातून निमंत्रण मिळाले आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित संवाद बैठकीत ते सहभागी होतील आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सोबत चर्चा करतील.
देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या प्रथम आदिवासी महिला आहेत. आदिवासी समाजाचा विकास करण्यासाठी त्या प्रयत्न करत आहे. त्यानुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मेळघाटमध्ये आदिवासी समाजासाठी मावस्कर यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना निमंत्रित केले आहे. 21 जुलै रोजी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे आयोजित संवाद बैठकीत ते सहभागी होतील. रमेश मावस्कर यांनी राजकीय जीवनात प्रवेश करताना उपायुक्त पदाची नोकरी सोडली.
भाजप प्रदेश सदस्य म्हणून रमेश मावस्कर यांना जबाबदारी देण्यात आली. मेळघाटच्या विविध समस्यांचा त्यांना सखोल अभ्यास आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याशी ते मेळघाटच्या विविध समस्यावर चर्चा करतील. या चर्चेतून जो काही निष्कर्ष निघेल तो केंद्र व राज्य सरकार यांना पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी सरकार पाऊल उचलणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे. रमेश मावसकर यांना निमंत्रण मिळाल्यामुळे त्यांचे सर्वच पातळीवरून अभिनंदन केल्या जात आहे.




