तपोवन परिसरात बिबट्याने केली कुत्र्याची शिकार
रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

-घराच्या आवारातून फरफटत नेले
अमरावती / 18 जुलै : स्थानिक तपोवन परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये आधीच बिबट्याची दहशत आहे. अशातच काल गुरुवारी मध्यरात्री बिबट्याने घराच्या आवारात बांधलेल्या एका पाळीव कुत्र्याची शिकार केल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर येथील रहिवासी चांगलेच भयभित झाल्याचे दिसून येते.
विदर्भ महारोगी सेवा संस्था, तपोवनचे उपसचिव ऋषिकेश देशपांडे यांच्या निवासस्थानी ही शिकारीची घटना घडली. देशपांडे आपल्या कुटुंबियांसह संस्थेच्या क्वॉर्टरमध्ये राहतात. घराच्या आवारात बांधलेला त्यांचा कुत्रा आज सकाळी तेथे नव्हता. त्याला ज्या साखळीने बांधण्यात आले होते ती साखळी आणि कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा मात्र पडून होता. याचवेळी देशपांडे कुटुंबियांना घराच्या कंपाउंड वॉलवर वेगळ्या प्रकारच्या पाउलखूना दिसल्या. आजूबाजूला रक्तही सांडले होते आणि कुत्र्याला फरफटत नेल्याचे निशानही होते. त्याचा माग घेत देशपांडे कुटुंबियांनी आजूबाजूला कुत्र्याचा शोध घेतला असता घरामागील झुडपांमध्ये कुत्र्याचा छिन्नविछीन्न मृतदेह त्यांना सापडला. हा भयावह प्रकार पाहुण देशपांडे कुटुंबिय हादरले होते. परिसरात माहिती पसरताच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून वडाळी वन विभागाच्या अधिकार्यांनी पाहणी केली व पाउलखूना तपासल्या. तेव्हा कुत्र्याची शिकार बिबट्याने केली असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले. बिबट्याने रात्री देशपांडे यांच्या घराच्या आवारात प्रवेश करुन कुत्र्याची शिकार केली. त्यानंतर त्याला ओढत झुडपात नेेले व फडशा पाडल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढला.
बिबट्याने या कुत्र्याचे अर्धे शरिर न खाता तसेच सोडून दिले आहे. त्यामुळे शिकारीवर ताव मारण्यासाठी तो पून्हा येथे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. या भागात दोन ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्यावर नजर ठेवली जात आहे. या भागात बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून आल्याने आणि कालच्या या शिकारीच्या घटनेमुळे रहिवाशांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




