अमरावतीच्या रस्त्यांवर धावणार 40 ई-बसेस
6 महिन्यांत कोंडेश्वर मार्गावर चार्जिंग स्टेशन

-25 जुलैला उघडणार ई-निविदा
-प्रकल्पावर होणार 30 कोटींचा खर्च
-केंद्र व राज्यासह महापालिकेकडूनही निधी
अमरावती / 16 जुलै: अमरावती शहरातील प्रदूषण कमी पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या वाहनांचा प्रयोग टाळून बॅटरीवर चालणार्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्राधान्य दिले जात आहे. त्याअंतर्गत नागरिकांकरिता ई-कार व ई-बाईक उपलब्ध करुन देतानाच सार्वजनिक परिवहन व्यवस्थेतही ई-बसेसची संख्या वाढविण्यात येत आहे. त्यानुसार अमरावती महापालिका क्षेत्रातही शहरातील प्रवासी वाहतूकीसाठी ई-बसेस चा वापर करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. लवकरच अमरावती शहरातील रस्त्यांवर महापालिकेकडून चालविल्या जाणार्या ई-बसेस शहरवासीयांच्या नजरेस पडणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अमरावती महापालिका क्षेत्रात 40 ई-बसेस चालविण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. त्यासाठी सुरुवातीला कोंडेश्वर मार्गावर जून्या जकात नाक्याच्या परिसरात सुमारे 2.83 हेक्टर जागेवर या ई-बसेसकरिता डेपो आणि दोन एकर क्षेत्रफळात चार्जिंग सेंटरची निर्मिती करण्यात येणार आहे. या चार्जिंग सेंटरमध्ये एकाचवेळी सहा बसेसची बॅटरी चार्ज करण्याची सुविधा राहणार आहे. या डेपो आणि चार्जिंग सेंटरसाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली आहे. 24 जुलैपर्यंत इच्छुक निविदा सादर करु शकतात. तर 25 जुलै रोजी निविदा उघडून सर्वात कमी बोली लावणार्या निविदाकर्त्याचे नाव जाहिर केले जाईल. त्याच्याकडे एल-1 च्या आधारावर चार्जिंग सेंटर उभारण्याची जबाबदारी सोपविण्यात येईल.
सदर कंत्राटदाराला कंत्राट मिळाल्यापासून 6 महिन्यांच्या आत ई-बसेसचा डेपो आणि चार्जिंग सेंटर उभारणीचे काम पूर्ण करणे अनिवार्य राहणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच नव्या कोर्या, चमकदार ई-बसेस नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असून त्या अमरावतीच्या रस्त्यांवर प्रत्यक्ष धावताना दिसतील. या संपूर्ण प्रकल्पावर 30 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली आहे. त्यात 22 कोटी रुपयांतून 40 ई-बसेस केंद्र सरकारकडून अमरावती महापालिकेला उपलब्ध करुन देण्यात येईल. या ई-बसेसचा सांभाळ आणि दुरुस्तीची जबाबदारी केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात येणार असलेल्या आणि बसेसचा पूरवठा करणार्या कंत्राटदाराकडेच राहणार आहे. तर या बसेस चालविण्याची संपूर्ण जबाबदारी अमरावती महापालिकेकडून पार पाडली जाईल. त्यासाठी चालक-वाहकांची व अन्य कर्मचार्यांची नियुक्ती तसेच तिकीटांचा हिशेब ठेवण्याचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे.
कोंडेश्वर मार्गावर निर्माण करण्यात येणार असलेल्या डेपो आणि चार्जिंग सेंटरवर 8.15 कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. चार्जिंग सेंटरवरच 3.73 कोटी रुपये खर्च केले जातील. अन्य रकमेतून येथील इमारतींचे बांधकाम केले जाईल. इलेक्ट्रिफिकेशनच्या संपूर्ण कामावर होणार्या खर्चाचा भार राज्य सरकारकडून उचलला जाणार आहे. तर बांधकामाकरिता येणार्या खर्चात केद्र सरकारची 60 टक्के तर राज्य सरकारची 40 टक्के भागीदारी राहणार आहे. काही तुरळक कामांवरील खर्च अमरावती महापालिकेकडून करण्यात येणार आहे.
आगामी 2026 या वर्षात अमरावती शहरात ई-बस सेवा कार्यान्वित होणार असल्याचा विश्वास महापालिकेतील सूत्रांनी व्यक्त केला आहे. ही नववर्षात अमरावतीकरांसाठी अनमोल भेट ठरणार आहे. या 40 ई-बसेसमधील 10 बसेस 6 मीटर, 10 बसेस 7 मीटर आणि 20 बसेस 9 मीटर लांबीची राहणार आहे. या बसमधून अमरावतीकरांना आरामदायी प्रवासांची अनूभूती येईल, असे महापालिका सूत्रांचे म्हणणे आहे. शहरातील ध्वनी व हवेतील प्रदूषण टाळले जावून शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीही या प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे.




