विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर भाजप पदाधिकार्‍यावर ‘अ‍ॅट्रोसिटी’

मुलीची छेड काढणे भोवले, तिवसा येथील घटना

-वंचितच्या मागणीनंतर पोलिसांची कारवाई
-आरोपी मोहित मोटघरेची तुरुंगात रवानगी
तिवसा / 16 जुलै: तिवसा पोलीस ठाण्यात गत 10 जुलै रोजी भाजप पदाधिकारी असलेल्या मोहित अशोक मोटघरे या आरोपीवर गावातील एका युवतीची छेड काढल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. अनेकांचे लक्ष लागून असलेल्या या प्रकरणात आता तिवसा पोलीसांनी आरोपी मोहितवर अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याचीही नोंद केली आहे. पिडित युवती अनूसूचित जातीतील असल्याने आरोपी मोहितवर विनयभंगासोबत अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत कारवाई करण्याची मागणी वंचित बहूजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी लावून धरली होती. त्यामुळेच घटनेनंतर चार दिवसांनी मोहितवर अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्याची नोंद झाली. त्याची सध्या तुरुंगात रवानगी करण्यात आल्याची माहिती तिवसा पोलिसांनी दिली आहे.
आरोपी मोहित मोटघरे हा भाजपचा सोशल मीडिया संयोजक आहे. त्याला हे प्रकरण चांगलेच भोवणार असे दिसून येत आहे. 10 जुलै रोजी मोहितने भररस्त्यावर पिडितेची छेड काढून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. वडिलांसमोरच तिला बळजबरी करण्याची आणि जिवे मारण्याची धमकी दिली होती. पिडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र फिर्यादी मुलगी ही अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याने मोहितवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्ह्याची सुद्धा नोंद करणे आवश्यक होते. तशी मागणीसुद्धा पोलिसांकडे करण्यात आली होती. मात्र मोहितवर अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत कारवाई करण्यास पोलिसांनी टाळाटाळ चालविली होती. त्यामुळे राजकिय क्षेत्रातून रोष व्यक्त केला जात होता.
आरोपी हा भाजपा पदाधिकारी असल्याचे सर्वाना अवगत असून त्याच बळावर आरोपी हा फिर्यादीला वारंवार त्रास देत होता, असे फिर्यादीच्या कुटुंबाने म्हटले आहे. राजकीय सत्तेच्या पाठबळाचा वापर करून सामान्य जनतेस व शैक्षणिक कामानिमित्त घराबाहेर पडणार्‍या युवतींना वेठीस धरणार्‍या लोकांना धडा शिकवण्यासाठी तसेच अशा घटनेची कुठेही पुनरावृत्ती टाळण्याकरिता आरोपीला कठोर शासन होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीवर अ‍ॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद केली जाणे गरजेचे आहे, अशी ठाम भूमिका घेत वंचितचे सागर भवते यांनी हे प्रकरण लावून धरले होते. अखेर चार दिवसानंतर मोहित मोटघरे याच्याविरुद्ध अट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करणे पोलिसांना भाग पडले आहे. आरोपी मोहित मोटघरेची कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती तिवसा पोलीसांनी दिली.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button