युवकाच्या घरातून पोलिसांनी हस्तगत केली प्राणघातक शस्त्र
खंजीर, कुकरी आणि चायना चाकूचा समावेश

-गुन्हे शाखा युनिट-1 ची कारवाई
अमरावती / 15 जुलै: धरमकाटा परिसरात संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या एका युवकाला ताब्यात घेउन पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या घरी तिक्ष्ण शस्त्रे असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरातून खंजीर, कुकरी आणि चायना चाकू असे 9 घातक शस्त्र जप्त केले. हे शस्त्र अजमेरवरुन आणल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. गुन्हे शाखा युनिट – 1 च्या पथकाने ही कारवाई केली. साकिब खान सगीर खान (नूर, नगर, कच्छी कॉलनी, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी जवळ शस्त्र बाळगून दहशत पसरविणार्या गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखा आणि सर्व पोलिस ठाण्याना दिले आहे. याबाबत सतर्कता बाळगून पोलिस अशा आरोपींवर पाळत ठेवून आहेत. अशातच सोमवारी रात्री साकीब नामक युवकाने काही दिवसापूर्वी अजमेर येथून शस्त्रे आणली असून तो सध्या धरमकाटा परिसरात फिरत असल्याची गोपनिय माहिती गुन्हे शाखा युनिट – 1 चे निरिक्षक गोरखनाथ जाधाव यांच्या नेतृत्वातील पथकाला मिळाली होती. तेव्हा या पथकाने तातडीने धरमकाटा परिसरात जावून साकिबला ताब्यात घेतले. साकिबची कसून चौकशी केली असता त्याने आपण अजमेरवरुन शस्त्रे आणली असून ती आपण नूर नगर, कच्छी कॉलनी येथील आपल्या घरी लपवून ठेवल्याचे पोलिसांना सांगितले.
गुन्हे शाखेच्या पथकाने साकिबच्या घरी जावून झडती घेतली असता त्यांना कुकरी, चायना चाकू, खंजीर अशी 9 घातक शस्त्रे आढळून आली. ती जप्त करण्यात आली असून आरोपी साकिबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सहायक निरीक्षक मनीष वाकोडे, इमरान नायकवडे, हेडकांस्टेबल फिरोज खान, सतीश देशमुख, सचिन बहाले, प्रशांत मोहोड, अलिमउद्दीन खतिब, जवान नाजीमउद्दीन सैयद, विकास गुडधे, सचिन भोयर, रंजीत गावंडे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, अशोक खंगार, किशोर खेंगरे यांनी केली.




