दोन गटात संघर्षाचा फोन कॉल आणि पोलिसांची तत्परता

पोलिस पोहोचण्यापूर्वीच सर्व शांत

-तिक्ष्ण शस्त्रांसह रिवॉल्वर निघाल्याची चर्चा
-ट्रान्सपोर्ट नगरातील घटना
अमरावती / 15 जुलै: नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ट्रांसपोर्ट नगर भागात टीपू सुलतान मार्केटसमोर दोन गट प्राणघातक शस्त्रांसह एकमेकांवर धावून आले असल्याचा अज्ञात व्यक्तीचा फोन कॉल पोलिसांना आला आणि पोलिसांनीही क्षणाचाही विलंब न लावता तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिस पोहोचण्यापूर्वीच सर्व शांत झा होते. घटनास्थळी कोणीही आढळून आले नाही. पोलिस येण्याच्या काही वेळ आधी दोन गट समोरासमोर आले होते. ते एकमेकांवर प्राणघातक शस्त्र उगारण्याच्या तयारीत होते आणि रिवॉल्वरही ताणण्यात आली होती, अशी चर्चा आहे. ही घटना गांभीर्याने घेउन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. हे लोक कोण होते आणि नेमके रात्री ट्रांसपोर्टनगरात काय घडले, याचा शोध पोलिस घेत आहे. सतर्कतेसाळी या भागात मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
सोमवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीचा हा फोन कॉल आला होता. त्यानेच दोन गटांत कडाक्याचे भांडण होउन एकमेकांवर शस्त्र उगारण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर नागपूरी गेट, गाडगेनगर ठाण्यातील पोलिस ताफ्यासह दोन सीसीआर व्हॅन, गुन्हे शाखा युनिट-1 चे पथक असा लवाजमा संपूर्ण तयारीने घटनास्थळी काही वेळातच दाखल झाला. मात्र पोलिस पोहोचले तेव्हा या परिसरात सर्वत्र शांतता दिसून आली. दोन्ही गटातील सदस्य घटनास्थळाहून निघून गेले होते. मात्र पोलिसांनी त्यानंतरही रात्रभर येथे तळ ठोकून परिस्थितीवर पाळत ठेवली.
भांडणात तिक्ष्ण शस्त्रांसोबतच रिवॉल्वर निघाल्याचा प्रकार गंभीर असल्याने आणि यापुढे पून्हा हा संघर्ष उफाळून येउ नये याकरिता सतर्कता म्हणून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित लोक नेमके कोण होते, याचा शोध सुरु केला आहे. याप्रकरणात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, पण या घटनेसंदर्भाने परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. वाहनावरुन दोन गटात हे भांडण झाल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button