‘रॉयल स्टॅग’च्या बाटल्यांमधून नकली दारुची विक्री
गुन्हे शाखेने उघड केला गोरखधंदा

-गोदामावर छापा, दोघांना अटक
-3.14 लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती / 15 जुलै: मध्य प्रदेशातून आणलेली निम्न दर्जाची दारु ‘रॉयल स्टॅग’सारख्या मद्याच्या नामांकित कंपनीच्या रिकाम्या बाटल्यांत भरुन तिची विक्री करण्याचा गोरखधंदा अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-2 ने आज एका कारवाईतून उघड केला आहे. अशा पद्धतीने अमरावती शहर आणि जिल्ह्यात नकली दारुची मोठ्या प्रमाणात विक्री करुन मद्यप्रेमींच्या जिविताशी खेळ सुरु असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
गुन्हे शाखा युनिट – 2 ने शहरातील जयस्तंभ चौक परिसरात वसंत टॉकिजनजीक असलेल्या एका गोदामावर छापा मारुन या नकली दारु विक्रीच्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. मोठ्या प्रमाणात नकली दारु येथून पोलिसांनी हस्तगत केली. पोलिसांनी या गोदामाशी संबंधित दोन आरोपींना स्विफ्ट कारमधून नकली दारु विक्री करण्याच्या प्रयत्नात फिरत असताना अटक केली. त्यांची कारही पोलिसांनी जप्त केली आहे. गौरव उर्फ विक्की किशोर मातोले (38, रा. संतोषी नगर, अमरावती) आणि राज सुनील साहू (35, रा. रतनगंज अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील राज सुनिल साहु हा या अवैध व्यवसायाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समजले.
गुन्हे शाखा युनिट – 2 चे निरिक्षक संदीप चव्हाण यांना याबाबत गोपनिय माहिती मिळाली होती. दोन व्यक्ती स्वीफ्ट डिझायर कारमधून फिरुन नकली दारु शहरात विकण्याचा प्रयत्न करित असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या कारचा शोध घेतला आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी आपली नावे गौरव मातोले आणि राज साहु असल्याचे पोलिसांना सांगितले.
दोघांचीही चौकशी केली असता त्यांनी वसंत टॉकिजशेजारी गोदामामध्ये चालणार्या व्यवसायाची माहिती पोलिसांना दिली आणि या नकली दारु विक्रीचा भंडाफोड झाला. मध्य प्रदेशातून निम्न दर्जाची गोवा नामक दारु तस्करी करुन शहरात आणली जाते. नंतर वसंत टॉकिजनजीक असलेल्या एका गोदामात रॉयल स्टॅग या नामांकित कंपनीच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये ही नकली दारु भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि विक्रीसाठी या बाटल्या दारु विक्रेत्यांपर्यंत पोहोचविल्या जातात, असे या आरोपींनी पोलिसांना सांगितले.
त्यावरुन गुन्हे शाखेने या गोदामावर छापा मारला. येथून पोलिसांनी नकली दारुच्या 515 बाटल्या, रॉयल स्टॅग कंपनीच्या 513 सिलबंद आणि 74 रिकाम्या बाटल्या यासह एकुण 3 लाख 14 हजार 425 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातून अमरावती शहरात नामांकित दारु कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये नकली दारु भरुन तिची विक्री करण्याचा व्यवसाय जोरात सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील वाईन शॉप, बिअर बारमधून ही बनावट दारु ग्राहकांना पुरविली जात असण्याची शक्यता आहे. या प्रकारातून राज्य उत्पादन शूल्क विभागाच्या कार्यप्रणाली आणि भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




