एपीएमसीचे सचिव दीपक विजयकर यांचा पदभार काढला

डीडीआर घोटाळ्याची एसीबीकडून चौकशी पूर्ण

-सहकार मंत्री अतुल सावे यांची घोषणा
-आ. संजय खोडकेंनी उचलला मुद्दा
-संचालकांचा फैसला कोर्टाच्या निर्णयानंतर
अमरावती / 15 जुलै: अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डीडीआर घोटाळ्याची एसीबीकडून चौकशी पूर्ण होताच समितीचे सचिव दीपक विजयकर यांना पदावरुन हटविण्यात आले आहे. राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विजयकर यांचा पदभार काढण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. याबाबत आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेमध्ये मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, चौकशीतून अमरावती बाजार समितीच्या संचालकांवर डीडीआर घोटाळा सिद्ध झाला आहे. परंतू हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. संचालक मंडळाबाबतच्या कारवाईबाबत कोर्टाच्या निर्णयाची प्रतिक्षा केली जाईल. त्यानंतर योग्य कार्यवाही केली जाईल.
पावसाळी अधिवेशनात आज विधान परिषदेतील कार्यवाहीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांनी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचा मुद्दा उपस्थित केला. याप्रकरणात सहकार विभागाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली, असा प्रश्न मंत्री अतुल सावे यांना विचारला. बाजार समिती सचिव दीपक विजयकर यांची या घोटाळ्यासंदर्भाने एसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. सोबतच डीडीआरनेही अमरावाती बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळाला एपीएमसीत कथित विकास कार्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचारासाठी दोषी ठरविले होते. पुढील कार्यवाहीसाठी सहकार विभागाला अहवालही पाठविण्यात आला होता. त्यानुसार कोणती पाउले विभागाने उचलली आहेत, अशी विचारणाही संजय खोडके यांनी केली.
खोडके यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, नियम 45 नुसार या प्रकरणाचा तपास करण्यात आला असून तो पूर्ण झाला आहे. चौकशी दरम्यान अमरावती बाजार समितीचे संचालक मंडळही या भ्रष्टाचार प्रकरणात समितीला दोषी आढळून आले आहे. परंतू संचालक मंडळाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
अशात न्यायालयाने अंतरिम आदेश पारित करण्याची सुट दिली आहे. तरीही याप्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा सहकार विभागाकडून केली जात आहे. सचिव दीपक विजयकर हे लाल लुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत दोषी आढळून आल्याने त्यांना आजच सचिवपदावरुन मुक्त करण्यात येत असल्याची घोषणा अतुल सावे यांनी केली. न्यायालयाचा निर्णय येताच याप्रकरणात अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर कोणती योग्य कार्यवाही करावी, याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सावे यांनी स्पष्ट केले.
-प्रभार सहाय्यक रजीस्ट्रार यांच्याकडे
दीपक विजयकर यांना बाजार समितीच्या सचिव पदावरुन हटविल्यानंतर त्यांचा प्रभार सहाय्यक रजीस्ट्रार यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. अमरावती एपीएमसीमधील 44 लाख रुपयांच्या कामांना उपनिबंधकांनी मान्यता दिली होती. परंतू सरकारचे नियम डावलून या कामांमध्ये अनियमितता आढळून आली. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. वीजेसंबंधीची कामे करण्यासाठी कोणतीही निविदा न काढता बनावट दस्तावेज तयार करुन सरकारी निधीचा गैरवापर करण्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. आ. संजय खोडके यांनी याप्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल करुन अपहाराच्या पैशांची त्यांच्याकडून वसुली करण्याची मागणी केली आहे.

-आपल्याविरोधात षडयंत्र : विजयकर
दीपक विजयकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, माजी उपसभापती गणेश कडू यांनी 2018 मध्ये आपल्याविरुद्ध याचिका आणि 2019 मध्ये पुर्नयाचिका दाखल केली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर याचिका मागे घेण्यासाठी आपल्याकडे पैशांची मागणीही करण्यात आली होती. असा आरोप विजयकर यांनी केला आहे. आता वैयक्तिक शत्रुत्वातून माझ्याविरुद्ध आमदारांकडे तक्रार करण्यात आली असून ही संपूर्ण माहिती खोटी असल्याचा दावा, त्यांनी केला. पत्रकार परिषद घेउन वस्तूस्थिती मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button