माळु नदीपात्रात आढळला हिवरखेडच्या युवकाचा मृतदेह
दोन दिवसांपासून घरातून होता बेपत्ता

-आत्महत्या की घातपात? पोलिस तपास सुरु
मोर्शी / 14 जुलै: 10 जुलैपासून घरातून बेपत्ता असलेल्या हिवरखेड येथील एका 28 वर्षीय युवकाचा मृतदेह माळू नदीच्या पात्रात आढळून आल्याच्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. दिलीप शंकर नागले असे मृतकाचे नाव आहे. दिलीपने आत्महत्या की त्याचा घातपात झाला, याबाबत चर्चांना उधान आले असून मोर्शी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
मोर्शीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरखेड येथील रहिवासी दिलीप नागले हा गुरुवार, 10 जुलै रोजी आपल्या एमपी 48/एमझेड 3901 क्रमांकाच्या मोटरसायकलने कोणालाही न सांगता घरातून निघून गेला. त्यानंतर तो परतला नाही. बेपत्ता दिलीपचा कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला पण तो सापडला नाही. दरम्यान मोर्शी पोलिसांना शनिवारी रात्री माळु नदीच्या काठावर दिलीपची दुचाकी आढळून आली. पोलिसांनी पाहणी केली असता, नदी पात्रात दिलीपचा मृतदेह असल्याचेही निष्पन्न झाले. याबाबत दिलपचा भाउ धनराज नागले यांना कळविण्यात आले.
रात्री अंधारामुळे दिलीपचा मृतदेह नदीबाहेर काढता येणे शक्य नव्हता. त्यामुळे दुसरे दिवशी रविवारी बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर दिलीपच्या पार्थिवावर हिवरखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दिलीपने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला, हे स्पष्ट होउ शकले नाही. शवविच्छेदन अहवालातून नेमके कारण समोर येणार आहे. पोलिसांनी आपल्या पातळीवर तपासाला सुरुवात केली आहे. याप्रकरणात अकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मृतक दिलीप नागले हा डोक्याच्या आजाराने ग्रस्त होता आणि त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरु होते, अशी माहिती मिळाली आहे.




