जिल्ह्यातील 575 बार बंद, 4 कोटींचा व्यवसाय ठप्प
परमिट रुम संचालकांचे आंदोलन

-शासनाच्या करवृध्दीला तीव्र विरोध
-जिल्हा कचेरीवर मोर्चाद्वारे धडक
अमरावती / 14 जुलै: वॅटमध्ये 10 टक्के वृध्दि आणि परवाना शूल्कात 15 टक्के वाढ करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आज अमरावती शहरासह जिल्ह्यातील परमिटरुम संचालकांनी बंद पाळला. राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारचा कर वृध्दिचा निर्णय आमच्यासाठी अन्यायकारक असल्याचा आरोप करुन बार संचालकांनी इर्विन चौकातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तेथे सुमारे तासभर सरकारी धोरणाविरोधात निदर्शने केली. यावेळी बार संचालकांच्या संघटनेचे अध्यक्ष नितीन मोहोड यांच्यासह संजय मानकर, अनिल तरडेजा, जयंत वाकोडे, आशीष देशमुख, मदन जायसवाल, संजय छाबडा यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
शहरातील 125 आणि जिल्ह्यातील 450 असे 575 बार व रेस्टॉरंट आज या आंदोलनादरम्यान बंद राहीले. त्यामुळे दिवसभरात या व्यवसायाच्या माध्यमातून होणारी सुमारे 4 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प राहीली. उल्लेखनीय आहे की, राज्य सरकारने बार परवान्याच्या शूल्कासोबतच विदेशी मद्यावरील करांमध्ये 15 ते 60 टक्क्यांपर्यंत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे हा व्यवसायच धोक्यात आला असल्याचे बार संचालकांचे म्हणणे आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज राज्यभरातील सुमारे 20 हजार बार संचालकांनी बंद पूकारला होता. संचालकांसोबतच बार, परमिट रुममध्ये काम करणारे कर्मचारी असे हजारो लोक या आंदोलनात सहभागी झाले होते.
सरकारने कर आणि परवाना शूल्कात केलेल्या वृध्दिमुळे अमरावती जिल्ह्यातील जवळपास दोन डझन आणि राज्यभरातील 1100 बार बंद पडले असल्याचा दावा परमीट रुम संचालकांच्या संघटनेने केला आहे. सरकारने आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करुन करवृध्दि मागे घेतली नाही, तर यापुढे बेमुदत बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आजच्या आंदोलनात उपरोक्त पदाधिकार्यांसह गजानन राजगुरे, विनोद रहाटे, दिगंबर गुल्हाने, सतपालसिंह अरोरा, विनोद भगत, राजू मुळे, सूर्यकांत जायसवाल, आकाश शिरभाते, आशीष बेतरिया, रोहित खुराना, प्रशिक पटोकार, ज्ञानेश्वर ठाकरे, अंगद देशमुख, लाठी नंदा, सुरेश चांदवानी तसेच अमरावती जिल्हा देशी-विदेशी दुरु विक्रेता संघटना, अमरावती शहर परमिट रूम असोसिएशन, जिल्हा परमिट रूम असोसिएशनचे पदाधिकारी व सभासद आणि बारमधील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




