राजकुमार सुंदरानी हत्याकांडातील दोन्ही आरोपी जेरबंद
राजस्थानमधून केली अटक

-गुन्हे शाखा युनिट-1 ची कामगिरी
अमरावती / 14 जुलै: रहाटगाव येथे एका बिअर बारसमोर शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या राजकुमार सुंदरानी (54, रा. रामपुरी कॅम्प) यांच्या भीषण हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अमरावती शहर पोलिस गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने राजस्थानातून अटक केली आहे. घटना घडल्यानंतर तिसर्या दिवशी सुंदरानी यांच्या मारेकर्यांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखेने यश प्राप्त केले. शिवा फुलवाणी (42, रा. रामपुरी कॅम्प, अमरावती) आणि बंटी पवार (30, लोहार लाईन, विलास नगर, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत.
राजकुमार सुंदरानी आणि त्यांचे मारेकरी शिवा फुलवाणी आणि बंटी पवार हे आपसात मित्र होते. रहाटगाव येथील इंपेरियल बारमध्ये शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत त्यांनी सोबत मद्यप्राशन केले. बारमधून बाहेर पडल्यानंतर राजकुमार आणि शिवा यांच्यात जुगाराच्या पैशांच्या कथित कारणावरुन वाद झाला. भांडण विकोपाला गेल्यानंतर शिवाने बंटी याच्याकडून चाकू घेउन राजकुमारवर सपासप वार केले होते. त्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होउन ते घटनास्थळीच गतप्राण झाले. घटनेनंतर राजकुमारला तेथेच रक्ताच्या थारोळ्यात सोडून दोन्ही आरोपी दुचाकीने घटनास्थळाहून पसार झाले होते.
खूनाचा हा संपूर्ण घटनाक्रम बारसमोरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. राजकुमार सुंदरानी यांचे मोठे बंधू प्रकाश सुंदरानी यांनी हे फुटेज बघितल्यानंतर नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करुन मारेकर्यांना अटक करण्यासाठी शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. या हत्याकांडाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-1 कडे सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेने तांत्रिक तपासावर भर देत आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न चालविले होते.
अशातच आरोपी शिवा फुलवाणी आणि बंटी पवार हे राजस्थानमध्ये पळून गेल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी त्यांचे लोकेशन ट्रेस केल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक राजस्थानच्या कोटा जिल्ह्यत रवाना झाले होते. या आरोपींनी पोलिसांना चकमा देण्याचा भरपूर प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी आपले संपूर्ण कसब वापरुन अखेर त्यांना जेरबंद करण्यात यश प्राप्त केले. दोन्ही आरोपींना घेउन पोलिस अमरावतीकडे निघाले होते. आज रात्री उशिरापर्यंत ते अमरावतीत पोहोचण्याची शक्यता आहे. जुगारातील पैशावरुन झालेल्या वादातून राजकुमार सुंदरानीची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक कारण घटनेनंतर पुढे आले होते. आता आरोपींच्या प्रत्यक्ष चौकशीतून ठोस कारण पुढे येईल, असे पोलिसांनी सांगितले.




