एकावर चाकूने हल्ला तर दुसर्याला जिवघेणी मारहाण
चिचफैलमध्ये घडलेल्या घटनांनी तणाव

-परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात
अमरावती / 13 जुलै: आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी एका युवकाने आधी 23 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करुन त्याला गंभीररीत्या जखमी केले आणि त्यानंतर काही तासांनी आणखी एका युवकाला विटेने प्रहार करुन व लाथाबूक्क्यांनी जिवघेणी मारहाण केली. या दोन्ही घटना चिचफैल परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडल्या. त्यामुळे परिसरात खळबळ उडून तणावाची स्थिती निर्माण झाली होती. राजेश जाधव (रा. बेलपूरा) असे चाकूने हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे. तर सोनु लक्ष्मण चावरे हा जिवघेण्या मारहाणीत जखमी झाला आहे. सोनु हासुद्धा बेलपूरातील रहिवासी आहे. या घटनांच्या पार्श्वभूमिवर परिसरात शांतता राहावी याकरिता बेलपूरा आणि चिचफैल येथे दोन दिवसांपासून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, राजेश जाधव आणि त्याच्या मित्रांचे गुरुवारी आरोपी चिचफैलमध्ये राहणार्या रोहित कोर्हटकर व त्याच्या मित्रांसोबत भांडण झाले होते. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास राजेश जाधव हा आपले मित्र सोनु सारवन व रोहित खंडारे यांच्यासोबत न्यू हायस्कूल बेलपूरा शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळत असताना रोहित कोर्हटकर तेथे आला. आदल्या दिवशीच्या भांडणाची कुरापत त्याने पून्हा उकरुन काढली आणि त्याबाबत राजेशला जाब विचारला. राजेश त्याला समजावून सांगत असतानाच रोहितने जवळचा चाकू काढून राजेशच्या मांडीत मारला. राजेशने कशीबशी रोहितच्या तावडीतून सुटका करुन तेथून पळ काढला आणि राजापेठ पोलिस स्टेशन गाठले. रक्तस्त्राव होत असल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले.
या घटनेनंतर काही तासांनी रोहित कोर्हटकर याने आपला मित्र विशाल यादव तसेच अन्य दोन साथीदारांसह सोनु चावरेवर चिचफैल चौकात हल्ला चढविला. शुक्रवारी रात्री कामावरुन परतून बेलपूरा येथील आपल्या घरी जात असताना सोनु चावरे एका पाणठेल्यावर थांबला होता. त्याचवेळी रोहित हा विशाल यादव आणि आणखी दोन युवकांसमवेत तेथे पोहोचला. तू खुप माजला का, असे म्हणत त्यांनी सोनुला मारहाण करण्यास सुरुवात केली. रोहित व विशालने विटेने सोनुच्या डोक्यावर जोरदार प्रहार केले. तर अन्य दोन युवकांनी त्याला लाथाबूक्क्यांनी मारहाण केली. यावेळी घटनास्थळी हजर असलेल्या परिसरातील काही लोकांनी मध्यस्थी करुन सोनुला हल्लेखोरांच्या तावडीतून सोडविले.
या मारहाणीत सोनु चावरे याचे डोके फुटून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याच्या उजवा हात आणि छातीलाही गंभीर दुखापत झाली. तो काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हता. गंभीर अवस्थेत सोनुचा भाउ आकाश सुभाष चावरे याने त्याला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात नेले. सोनुची दुखापत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेण्याचा सल्ला अमरावतीच्या डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान याप्रकरणी सोनु चावरे आणि राजेश जाधव यांच्या तक्रारीवरुन राजापेठ पोलिसांनी चारही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.




