उद्या जिल्हयातील 350 बार, रेस्टॉरंटचा ‘बंद’

सरकारच्या कर वाढीला तीव्र विरोध

-जिल्हा परमिट रुम संघटनेचे आंदोलन
अमरावती / 12 जुलै: अमरावती जिल्हा परमिट रुम संघटनेच्या आवाहनावरुन सोमवार, 14 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व 350 परमिट बार आणि रेस्टॉरेंट एक दिवस बंद ठेवले जाणार आहे. सरकारने केलेल्या भरमसाठ करवाढीविरोधात हे आंदोलन पूकारण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी सकाळी 11 वाजता इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हा परमिट रुम संघटनेचे अध्यक्ष नितिन मोहोड, उपाध्यक्ष सूर्यकांत जायसवाल आणि सचिव आशीष देशमुख यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, सरकारची धोरणे बार रेस्टॉरंटच्या व्यवसायावर दुष्परिणाम करणारी असून त्यामुळे हा व्यवसायच धोक्यात आला आहे. शासनाने बार चालकांवर 10 टक्के वॅट लादला आहे. तसेच परवाना शूल्क 15 टक्क्यांनी वाढविले आहे. त्यात भरीस भर म्हणून मद्यांच्या किंमतीतही थेट 50 टक्क्यांनी भरमसाठ वृद्धी केली गेली आहे. त्यामुळे बार व्यावसायिकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
करांमध्ये वाढ करण्यासोबतच सरकारकडून व्यावसायिकांवर जाचक बंधनेही लादली जात आहेत. त्यामुळे परमिट रुम चालविणे जिकरिेचे काम बनले आहे. अमरावती जिल्ह्यात या धोरणामुळे जवळपास दोन डझन आणि राज्यात 1100 बार व रेस्टॉरंट बंद झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सोमवारच्या आंदोलनातून सरकारच्या या निर्णयांना जोरदार विरोध करण्यात येणार आहे. सर्व बार, रेस्टॉरंट बंद ठेवून निषेध नोंदविला जाईल. असे संघटनेचे पदाधिकारी म्हणाले.
संघटनेच्या उपरोक्त पदाधिकार्‍यांसोबतच कार्याध्यक्ष संजय मानकर, उपाध्यक्ष जयंत वाकोडे, अनिल तरडेजा, सहसचिव मदन जायसवाल, कोषाध्यक्ष संजय छाबडा, कार्यकारिणी सदस्य सर्वश्री दिगंबर गुल्हाने, विनोद रहाटे, सतपाल सिंह अरोरा, विनोद भगत, राजू मुळे, सूर्यकांत जायसवाल, आकाश शिरभाते, आशीष बेतारिया, रोहित खुराना, प्रशिक पाटोकार, ज्ञानेश्वर ठाकरे आदी सर्व या आंदालनाच्या यशस्वितेसाठी प्रयत्नरत आहेत.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button