‘वसा’ला यंदाचा सोमेश्वर पुसदकर लोकगौरव पूरस्कार
पशु संवर्धन व पुनर्वसनात उल्लेखनीय योगदान

अमरावती / 12 जुलै: जखमी, आजारी, अनाथ आणि अपंग प्राण्यांची काळजी, त्यांच्यावर उपचार आणि त्यांचे पुनर्वसन याबाबतीत उल्लेखनिय कामगिरी करणार्या वासा कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन, अमरावती या संस्थेची सोमेश्वर पुसदकर लोकगौरव पुरस्कार-2025 साठी निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते व आझाद हिंद मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत सोमेश्वर पुसदकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी व्यक्ती, सामाजिक संस्था आणि संघटनेला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. 1 लाख रुपये रोख, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वसा संस्थेला समारंभपूर्व हा पूरस्कार प्रदान केला जाणार आहे.
सोमेश्वर पुसदकर यांनी आपल्या हयातीत शेकडो गरजू लोकांना मदत केली. जात-पात, धर्म, विचारधारा, संघटना याच्या पलीकडे जावून त्यांनी वेगवेगळ्या घटकांना कायम ताकत देण्याचे काम केले आहे. पुसदकर यांच्या कार्याचा वारसा चालत राहावा आणि त्यांच्यासारखं काम करणार्या व्यक्ती व संस्थांना बळ मिळावे, यासाठी लोक फाऊंडेशन, कृषी विकास प्रतिष्ठान, आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ, न्यू आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ व सोमेश्वर पुसतकर मित्रमंडळ या संस्थांच्या वतीने दरवर्षी सोमेश्वर पुसदकर यांच्या स्मृतीदिनी हा पुरस्कार देण्यात येतो. सन 2021 मध्ये ‘नानक रोटी ट्रस्ट’, 2022 ला श्री. संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल, 2023 यावर्षी अमरावती रक्तदान समिती, तर 2024 ला कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात नवीन पहाट आणणार्या ख्यातीप्राप्त ‘तपोवन’ या संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली ‘वसा’ ही संस्था 2008 मध्ये शुभम सायंके, निखिल फुटाणे, गणेश अकर्ते व भूषण सायंके या तरुणांनी संकटात सापडलेल्या प्राण्यांना वाचवण्याच्या उद्देशाने स्थापन केली आहे. छत्री तलावाजवळ मंगलधाम कॉलनीत उभारण्यात आलेल्या श्री गोवर्धन पशुवैद्यकीय रुग्णालय व ‘वसा’ प्राणी बचाव केंद्रात जखमी, आजारी, अनाथ आणि अपंग प्राण्यांची काळजी, उपचार आणि पुनर्वसन केले जाते. भटक्या आणि सोडून दिलेल्या प्राण्यांना सर्व प्रकारची आवश्यक वैद्यकीय मदत येथे दिली जाते. श्री गोरक्षण संस्था, अमरावतीने या तरुणांना त्यांच्या कामासाठी मंगलधाम कॉलनीत जागा उपलब्ध करून दिली आहे.
वसा संस्थेचे कार्यकर्ते दरवर्षी दरवर्षी हजारो भटक्या व अनाथ प्राण्यांना वाचवतात, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करतात आणि त्यांचे पुनर्वसनही करतात. प्राण्यांचे नियमित लसीकरणही येथे होते. आतापर्यंत 25 हजारापेक्षा अधिक प्राणी व पक्ष्यांवर ‘वसा’ मध्ये उपचार व पुनर्वसन झाले आहे. समाजातील प्राणी व पक्षी प्रेमी नागरिकांच्या मदतीने या तरुणांची ही धडपड सुरु आहे. विशेष म्हणजे यात काम करणारे सगळे तिशीच्या आतील तरुण आहेत. अतिशय समर्पित भावनेने हे तरुण ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना आपली वेदना सांगता येत नाही अशा मूक प्राणी व पक्ष्यांसाठी काम करतात.




