दोन अल्पवयीन वाहन चोरांना अटक

चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत

-फ्रेजरपूरा पोलिसांची कारवाई
अमरावती / 12 जुले: अमरावती शहरात सध्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून येत आहे. एकतर या मुलांकडून गैरकायदेशिर कृत्ये करवून घेतली जात आहेत, अथवा आपला छंद पूर्ण करण्यासाठी ते स्वत: गुन्हेगारीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. अशाच दोन अल्पवयीन मुलांना फ्रेजरपूरा पोलिसांनी वाहन चोरीच्या घटनांमध्ये अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या आरोपींचा एक साथीदार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. तोसुद्धा अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार महादेव खोरी येथील रहिवासी प्रशांत केशवराव लुटे (31) यांची टीव्हीएस कंपनीची लाल रंगाची स्पोर्ट बाईक 16 मे रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोरुन चोरीला गेली होती. लुटे यांच्या तक्ररीवरुन फ्रेजरपूरा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हींचे फुटेज तपासल्यानंतर तीन मुलांनी ही दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाली. पोलिसांनी त्यांची ओळख पटविली असता ते अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. फ्रेजरपूरा पोलिसांनी शोध घेउन तिघांपैकी दोन जणांना ताब्यात घेतले. या बालकांच्या पालकांसमोरच पोलिसांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी वाहन चोरीच्या घटनेची कबुली दिली. या बालकांचा तिसरा आरोपी फरार आहे, पोलिस त्याचा शोध घेत आहे.
लुटे यांच्या वाहनासह आपण शहरातून एकुण 5 दुचाकी वाहने चोरली असल्याचे या बालकांनी मान्य केले. चारीची ही पाचही वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्यांची किंमत 2.10 लाख रुपये असल्याचे समजते. महादेवखोरी, मोती नगर, राजेंद्र नगर, ऑक्सिजन पार्क आणि नांदगाव पेठ येथून या बालकांनी ही वाहने लंपास केली होती. ही कारवाई फ्रेजरपूराचे ठाणेदार रोशन सिरसाठ यांच्या नेतृत्वात निरिक्षक निलेश गावंडे, डीबी स्कॉडचे निरिक्षक राहुल महाजन, हेड कॉन्स्टेबल सुभाष पाटील, शिपाई सचिन बोरकर, शशिकांत गवई, सागर चव्हाण, जावेद पटेल, प्रशांत वानखडे, उमेश चुलपार यांच्या पथकाने केली.

संबंधित बातम्या

Back to top button