आता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीवर पोलिसांचे लक्ष
शाळांमध्ये स्थापन होणार परिवहन समिती

-स्कुलबस सुरक्षितता समितीची बैठक
-पोलिस आयुक्तांकडून दिशानिर्देश व सूचना
अमरावती / 10 जुलै: शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीवर आता अमरावती शहर पोलिस प्रशासनाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. विविध वाहनांद्वारे विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करताना कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याकरिता पोलिस प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या असून त्याच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. आज पोलिस आयुक्तालयात अमरावती जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीची बैठक पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयुक्तांनी यासंदर्भाने दिशानिर्देश देतानाच संबंधितांना महत्वपूर्ण सूचना केल्या.
बैठकीला समितीच्या नामनिर्देशित सचिव व प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे प्रामख्याने उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला 5 फेब्रुवारी 2025 च्या स्कुल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीतील निर्णयांचा आढावा पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घेतला. शाळेत ये-जा करताना विद्यार्थ्यांची वाहतूक अपघात विरहित आणि सुरक्षित व्हावी, याला पोलिस प्रशासनाचे प्राधान्य असून त्यासाठी नियमांच्या काटेकोर पालनावर भर देण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यादृष्टीने शहर व जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये तात्काळ शालेय परिवहन समितीची स्थापना करण्याची सूचना त्यांनी बैठकीत उपस्थित शिक्षण विभागाचे अधिकारी आणि मुख्याध्यापकांना दिली. या समितीची तीन महिन्यात एकदा बैठक घेण्यात यावी, असेही आयुक्तांनी सुचित केले.
शाळा सुटण्याचे वेळापत्रक निश्चित करावे, एकाच वेळी विद्यार्थ्यांची गर्दी होउन शाळा परिसरात गोंधळ निर्माण होउ नये आणि त्यातून अनूचित प्रकार घडू नये यादृष्टीने वेळापत्रकाची आखणी करण्याचे पोलिस आयुक्तांनी सुचविले. त्यांनी स्कुल बस संघटनेचे पदाधिकारी आणि बसचालकांनाही महत्वपूर्ण निर्देश दिलेत. स्कुल बसची नियमित देखभाल करावी, सर्व कागदपत्र सोबत ठेवावे, वाहनाला वेग नियंत्रक यंत्रणा बसवावी, बसमध्ये अग्नीशमन यंत्रणा, प्रथमोपचार पेटी असावी, बसचा संकटकालीन दरवाजा सुस्थितीत ठेवावा, आवश्यकतेनुसार महिला वाहकाची नेमणूक करावी, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक टाळावी, बसमधून प्रवास करणार्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती चालक व वाहकाने आपल्याकडे ठेवावी या बाबी अनिवार्य असून त्याचे पालन झालेच पाहीजे, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. स्कुल बस चालक व वाहकांची वैद्यकिय, नेत्र तपासणी तसेच चारित्र्याची तपासणी करुन घेण्याचे निर्देश आयुक्तांनी शालेय परिवहन समितीच्या अध्यक्ष आणि पदाधिकार्यांना दिले.
बैठकीत उपस्थितांनी मांडलेल्या प्रश्नांचे पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी निरसन केले. उपस्थितांनी मांडलेल्या उपाययोजनांची संबंधित विभागाकडून पूर्तता करण्यात येईल, त्याबाबत तातडीने पत्र व्यवहार करण्यात येईल असे सांगून आयुक्तांनी समितीच्या पदाधिकार्यांना आश्वस्त केले. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक हा बैठकीचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे आज ठरल्यानुसार सर्व संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी याबाबत आपले कर्तव्य चोख व प्रामाणिकपणे बजवावे, असे आदेश आयुक्तांनी दिले.
या बैठकीला वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त संजय खताळे, वाहतूक पोलिस निरिक्षक प्रविण वांगे, पोलिस निरिक्षक रिता उईके, फ्रेजरपूरा वाहतूक विभागाच्या निरिक्षक ज्योती विल्हेकर, जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखेचे सतिश पाटील, प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी संगिता सोनोने, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी निखिल मानकर, एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी योगेश ठाकरे, मनपा प्रतिनिधी शुभम शेरेकर, मनपा शिक्षण विभागाचे प्रविण ठाकरे, उकेश गोंडिक यांच्यासह शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय स्तरावरील वाहतूक समितीचे अध्यक्ष तसेच वाहतूक संस्थेचे पदाधिकारी रविंद्र गुल्हाणे, राहुल इंगळे, गजानन राजुरकर, सागर डवरे, बंडू कथलकर प्रामुख्याने उपस्थित होते.
-शाळांच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही अनिवार्य
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व शाळांनी मुख्य प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी यावेळी दिले. सीसीटीव्ही लावणे अनिवार्य असून अनेक शाळांनी ते बसविले आहेत. ज्या शाळांनी अद्याप प्रवेशद्वारावर कॅमेरे लावले नसेत, त्यांनी ताबडतोब त्याची व्यवस्था करावी, असे आयुक्तांनी सांगितले. त्यासोबतच आवश्यक संख्येत खाजगी सुरक्षा रक्षकांचीही नेमणूक करावी, अशी सूचना त्यांनी शाळांना दिली. विद्यार्थ्यांना वाहतूकीचे नियम व रस्ते सुरक्षेबाबत माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळांनी कार्यशाळेचे आयोजन करुन मार्गदर्शनासाठी वाहतूक विभागाच्या अधिकार्यांना पाचारण करावे, असे आयुक्तांनी सांगितले.




