वझ्झरचे बालगृह ‘वझ्झर मॉडेल’ म्हणून घोषित होणार

जिल्हाधिकारी आशिष येरेकर करणार प्रयत्न

-शंकरबाबा पापळकरांसोबत केली चर्चा
अमरावती / 9 जुलै: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज वझ्झर फाटा, ता. अचलपूर येथील स्व. अंबादास पंत वैद्य मतिमंद व मूकबधिर बालगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर यांच्यासोबत एक तास चर्चा केली. या बालगृहाला ‘वझ्झर मॉडेल’ म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले. त्याचसंदर्भाने आज जिल्हाधिकार्‍यांनी शंकरबाबा पापळकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी संपूर्ण बालगृहाची पाहणी केली. त्यानंतर मतिमंद व मूकबधिर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परिसरात विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांचीही पाहणी केली. संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर यांच्यासोबत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. चर्चेदरम्यान बालगृहाशी संबंधित महत्त्वाचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याबाबत विनंती करण्यात आली. यामध्ये बालगृहाला ‘वझ्झर मॉडेल’ म्हणून घोषित करणे, विद्यार्थ्यांचे मानधन पाच हजार रूपयांपर्यंत वाढवणे, विद्यार्थ्यांना आजीवन बालगृहात ठेवण्याची परवानगी देणे आणि वझ्झर मॉडेल विभागीय स्तरावर सुरू करणे, याबाबींचा समावेश आहे. जिल्हाधिकार्‍यांनी सदर प्रस्ताव शासनास सादर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी. एम. पुंड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सोंदळे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button