प्रसूतीदरम्यान मातेसह नवजात बाळाचा मृत्यु
नागपूर एम्सच्या डॉक्टरांवर हलगर्जीचा आरोप

-कुटुंबाकडून पोलिसांत तक्रार
-धामणगाव येथे झाले शवविच्छेदन
धामणगांव रेल्वे / 8 जुलै : धामणगाव रेल्वे तालुक्यातील झाडगांव येथील रहिवासी असलेल्या एका महिलेचा व तिच्या नवजात मुलाचा प्रसूतीदरम्यान नागपूरच्या एम्स रुग्णालयात मृत्यु झाला. दोघांच्या मृत्युसाठी एम्स रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप मृतक महिलेच्या कुटुंबियांनी केला असून याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. त्यानंतर महिला आणि तिच्या नवजात बाळाचे धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
कोमल अक्षय तायडे असे मृतक महिलेचे नाव आहे. गर्भवती असताना झाडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तिची तपासणी केली जात होती. दरम्यान 3 जुलै रोजी रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून आले आणि तिची प्रकृती खालावली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकार्यांच्या सल्ल्याने कोमल तायडे हिला उपचारासाठी वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघेच्या रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता कोमलची प्रकृती चिंताजनक असल्याचा हवाल देत तिला नागपूर येथे एम्समध्ये नेण्याचा सल्ला दिला.
कुटुंबिय कोमलला घेउन नागपूर एम्समध्ये गेले. तेथे गुंतागुंतीच्या परिस्थितीत तिची प्रसूती झाली आणि तिने मुलाला जन्म दिला. एम्समध्ये दोघांवरही उपचार सुरु असताना 6 जुलै रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास कोमल तायडे आणि तिच्या बाळाचा मृत्यु झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनो कुटुंबियांना दिली. दोघांच्या मृत्युबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करुन कोमलच्या कुटुंबियांनी नागपूर एम्सच्या डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला. धामणगाव रेल्वे येथे कुटुंबियांनी पोलिसांत यासंदर्भात तक्रारही दाखल केली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात कोमल आणि तिच्या बाळाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर तपासाची दिशा ठरविली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.




