भानखेडच्या 3.62 लाखांच्या घरफोडीतील आरोपी गजाआड
बडनेरा पोलिसांची कारवाई

-चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त
बडनेरा / 7 जुलै: 1 जुलै रोजी घराचे कुलुप तोडून आलमारीतील 2 लाख रुपयांची रोकड व सोन्या-चांदीचे दागीणे असा 3 लाख 62 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेणार्या आरोपीला बडनेरा पोलिसांनी अटक केली आहे. विशाल विजय शेंगर (23) असे आरोपीचे नाव आहे. तो भानखेडा गावातीलच रहिवासी आहे. बडनेरा पोलिसांनी त्याच्याकडून रोख रकमेसह चोरीचे संपूर्ण साहित्य हस्तगत केले आहे.
भानखेडा येथील रहिवासी असलेल्या संजय अंबादास शिंदे (35) याच्या घरी ही चोरीची घटना घडली होती. संजय शिंदेने त्याचा साळा सुरेश मांडवकर याच्याकडून दोन लाख रुपये उधार घेतले होते. ही रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागीणे असा 3 लाख 62 हजारांचा मुद्देमाल त्याने घरातील आलमारीत ठेवला होता. दरम्यान कामानिमित्त मध्यप्रदेशातील बैतुल येथे कुटुंबासह घराला कुलूप लावून गेला होता. दरम्यान रात्रीच्या सुमारास चोरट्याने घराचे कुलुप तोडून आलमारीतील संपूर्ण ऐवज लंपास केला होता. 1 जुलै रोजी संजय शिंदे आपल्या घरी परतला तेव्हा चोरीची ही घटना उघडकीस आली. त्याने तात्काळ बडनेरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन आरोपीवर गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला होता. बडनेराचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनील चव्हाण यांच्या आदेशावरुन डीबी पथक प्रकरणाचा तपास करित असताना या चोरीत भानखेडा येथीलच रहिवासी असलेल विशाल विजय शेंगर याचा हात असल्याची माहिती समोर आली. डीबी पथकाने विशालला ताब्यात घेउन त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. विशालने चोरीनंतर दोन लाख रुपये रोख व सोन्या चांदीचे दागीणे आपल्या घरीच ठेवले होते. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला. ही कारवाई बडनेराचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वात गुन्हे विभागाचे पोलिस निरिक्षक प्रफुल्ल गिते, सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप हिवाळे, डीबी पथक प्रमुख हेकॉ सुधीर प्रांजळे, रोषन निसंग, शशिकांत शेळके, विशाल पंडित, धनराज ठाकुर, मोहम्मद समिर, शुभम कडुकार यांच्या पथकाने केली.




