अपघातात जखमी फळविक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यु

मोर्शी / 5 जुलै: दहा दिवसांपूर्वी 25 जून रोजी लोटगाडीवर फळविक्रीचा व्यवसाय करणार्या 56 वर्षीय व्यक्तीला भरधाव आयवन कारच्या चालकाने धडक देवून त्याला गंभीररीत्या जखमी केल्याची घटना मोर्शी-चांदूर बाजार मार्गावर घडली होती. मोहन रामदिन प्रजापत नामक या फळविक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
मोहन प्रजापत हे शहरातील आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी होते. नेहमीप्रमाणे फळविक्रीसाठी लोटगाडी घेउन चांदूर बाजार मार्गाने जात असताना एमएच 05 / एजे 0231 क्रमांकाच्या कारच्या चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगात वाहन चालवून प्रजापत यांना जोरदार धडक दिली. त्यात प्रजापत हे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना डोक्याला व शरीराच्या अन्य अंगांना दुखापत झाली. अपघातानंतर प्रजापत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र काल त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी मोहन प्रजापत यांचा मुलगा दिनेश प्रजापत याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.




