चाकूच्या धाकावर प्रवाशाने ऑटोचालकास लुटले
20 हजारांची रोकड लंपास

-परतवाडा-करजगाव मार्गावर जबरी चोरी
अमरावती / 5 जुलै: लघुशंका आल्याचे कारण सांगून ऑटो थांबविल्यानंतर प्रवाशानेच चाकूच्या धाकावर ऑटोचालकाची 20 हजार रुपयांची रोकड लुटून पलायन केल्याची घटना परतवाडा-करजगाव मार्गावर घडली. मंगेश भाउराव सोलव (44, रा. कुर्हा देशमुख, ता. चांदुर बाजार) असे ऑटोलाचकाचे नाव आहे. त्यांनी शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
मंगेश सोलव हे ऑटोचालक असून परतवाडा-करजगाव मार्गावर आपल्या एमएच 49 / ई 1245 क्रमांकाच्या ऑटोरिक्षाने प्रवाशांची ने-आण करतात. गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास सोलव यांनी परतवाडा येथून तीन प्रवाशांना आपल्या ऑटोरिक्षात बसविले आणि करजगावकडे निघाले. त्यापैकी दोघेजण खरपी येथे उतरले. तर अनिकेत नावाच्या अनोळखी प्रवाशाने आपल्याला करजगाव येथे जायचे असल्याचे सांगितले. पुढे निघाल्यानंतर काही अंतरावर खरपी टी-पॉइंटनजीक या प्रवाशाने लघुशंकेचे कारण सांगून सोलव यांना ऑटो थांबविण्यास सांगितले.
ऑटो थांबविल्यानंतर हा अनोळखी युवक लगेच ऑटोतून खाली उतरला आणि त्याने ऑटोचालक सोलव यांना चाकूचा धाक दाखविला. त्याने सोलव यांच्या खिशातील 100 रुपयांचे दोन बंडल अशी एकुण 20 हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली आणि अंधाराचा फायदा घेत तेथून पलायन केले. या घटनेनंतर मंगेश सोलव यांनी तात्काळ शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यात जावून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनिकेत नामक अनोळखी आरोपीवर जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.




