लपून छपून विधेयक आणण्याचा प्रयत्न

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा डिलिमिटेशन विधेयकास विरोध

सातारा /27 नोव्हेंबर: केंद्रातील भाजप सरकारने 29 तारखेला विशेष अधिवेशन बोलावले असून डिलिमिटेशन विधेयकावरून देशातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार घडामोडी सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली. कोणालाही विश्वासात न घेता, मागच्या दाराने लपून छपून विधेयक आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच लोकसभेची सदस्य संख्या 543 वरून 850 झाली तर साखर कारखान्याच्या सभेसारखं चहा, लाडू-चिवडा खा आणि निघून जा, अशी संसदेची अवस्था होईल, अशी टीकाही त्यांनी केली.
कराडमधील निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने 29 नोव्हेंबरला विशेष अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन अद्याप स्थगित न केल्यामुळे सरकारला नवीन अधिवेशन बोलावता आले. त्यामुळे हे हिवाळी अधिवेशन नसून पावसाळी अधिवेशनाचाच पुढील टप्पा आहे. परंतु, कोणालाही विश्वासात न घेता, मागच्या दाराने लपून छपून परिसिमन (डिलिमिटेशन) विधेयक आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. डिलिमिटेशन विधेयकाचा मसुदा पाहिल्याशिवाय अंतिम भूमिका घेता येणार नाही. काँग्रेसचा डिलिमिटेशनला विरोध नाही. परिसिमन करायचे असेल तर करा. परंतु, राज्यांची तुलनात्मक जागांची संख्या बदलून कोणत्याही राज्यावर अन्याय होणार असल्यास त्याला काँग्रेसचा नक्कीच विरोध आहे. महिला आरक्षण आणण्यासाठी डिलिमिटेशन करत असल्याचा केंद्रातील भाजप सरकारचा दावा ही निव्वळ बोगसगिरी आणि खोटारडेपणा असल्याची टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

डिलिमिटेशनच्या घटनांचा दिला दाखला
पृथ्वीराज चव्हाण यांनी जुन्या घटनांचा दाखला देताना सांगितले की, परिसिमन ही घटनात्मक प्रक्रिया आहे. 1951, 1961 आणि 1971 च्या जनगणनेनंतर परिसिमन झाले होते. प्रत्येक जनगणनेनंतर राज्यांच्या लोकसभेतील जागांची तुलनात्मक संख्या बदलत राहिल्यास दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होईल. म्हणून 1976 मध्ये इंदिरा गांधी यांनी 1971 च्या जनगणनेनुसार लोकसभेच्या जागांची संख्या 25 वर्षांसाठी गोठवण्याचा निर्णय घेतला. 2001 मध्ये हा कालावधी संपल्यानंतर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आणखी 25 वर्षांसाठी जागा गोठवण्याचा निर्णय कायम ठेवला होता. अन्यथा दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय झाला असता.

Back to top button