3 लाख 24 हजार शेतकर्यांच्या खात्यात 162 कोटी जमा
शेतकर्यांना झाली प्रत्येकी 5 हजाराची मदत

* फार्मर आयडी, ई-केवायसीची करण्याचे आवाहन
अमरावती/26 नोव्हेंबर : जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 50 टक्के पाऊस झाला आहे. याचा परिणाम शेतपिकांवर झाला आहे. कमी पावसामुळे उत्पादन कमी येणार असल्याने दिलासा देण्यासाठी प्रत्येक शेतकर्यांना 5 हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत 3 लाख 24 हजार 971 शेतकर्यांच्या खात्यात 162 कोटी 48 लाख 55 हजारांची रक्कम जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कमी पर्जन्यमानामुळे त्याचा परिणाम कापुस, सोयाबीन, तुरीसह अन्य पिकांवर झाला. बहुतांश भागात शेतकर्यांना उत्पन्नात घट आली. येत्या रब्बी पिकांच्या पेरणीवर परिणाम होणार आहे. अशा स्थितीत शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर करून उपाययोजना सुरु केल्या आहे. दुष्काळीस्थितीमुळे हवालदील शेतकर्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली. जिल्ह्यातील शेतकर्यांच्या आधारलिंक खात्यात दि. 2 नोव्हेंबर पासून मदतीची रक्कम जमा होत आहे. ही रक्कम जमा होण्यासाठी शेतकर्यांनी फार्मर आयडी आणि ई-केवायसी करणे गरजेचे आहे. त्यामुळे पात्र शेतकर्यांनी तातडीने ही कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आतापर्यंत रक्कम जमा करण्यात आलेल्या शेतकर्यांची तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे आहे.अमरावती तालुक्यात 20 हजार 612 शेतकर्यांना 10 कोटी 30 लाख 60 हजार, अचलपूर तालुक्यात 29 हजार 266 शेतकर्यांना 14 कोटी 63 लाख 30 हजार, अंजनगाव सूर्जी तालुक्यात 23 हजार 797 शेतकर्यांना 11 कोटी 89 लाख 85 हजार, भातकुली तालुक्यात 22 हजार 198 शेतकर्यांना 11 कोटी 9 लाख 90 हजार, चांदूर रेल्वे तालुक्यात 17 हजार 334 शेतकर्यांना 8 कोटी 67 लाख 20 हजार, चांदूर बाजार तालुक्यात 19 हजार 956 शेतकर्यांना 9 कोटी 50 लाख 45 हजार, चिखलदरा तालुक्यात 8 हजार 376 शेतकर्यांना 4 कोटी 18 लाख 80 हजार, दर्यापूर तालुक्यात 32 हजार 395 शेतकर्यांना 16 कोटी 44 लाख 75 हजार, धामणगाव रेल्वे तालुक्यात 23 हजार 441 शेतकर्यांना 11 कोटी 72 लाख 5 हजार, धारणी तालुक्यात 14 हजार 515 शेतकर्यांना 7 कोटी 25 लाख 75 हजार, मोर्शी तालुक्यात 31 हजार 516 शेतकर्यांना 15 कोटी 75 लाख 80 हजार, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 29 हजार 307 शेतकर्यांना 14 कोटी 65लाख 35 हजार, तिवसा तालुक्यात 19 हजार 566 शेतकर्यांना 9 कोटी 78 लाख 30 हजार, वरूड तालुक्यात 33 हजार 84 शेतकर्यांना 16 कोटी 54 लाख 20 हजार इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.





