हिवरखेड रेल्वे स्थानकावर रेल्वे कधी थांबणार?
वर्षभरापासून रेल्वे गाड्यांचे थांबे बंद; प्रवासी, संत्रा उत्पादक शेतकरी आणि भाविकांची मोठी गैरसोय

रेल्वे स्थानकाची दुरवस्था; मूलभूत सुविधांकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष
हिवरखेड /26 नोव्हेंबर – हिवरखेड येथील रेल्वे स्थानकावर पूर्वी नियमितपणे थांबणार्या रेल्वे गाड्यांचे थांबे मागील जवळपास वर्षभरापासून बंद करण्यात आल्याने परिसरातील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकेकाळी परिसरातील प्रवाशांसाठी महत्त्वाचे असलेले हे रेल्वे स्थानक आता गाड्यांच्या थांब्याअभावी केवळ नावापुरतेच उरले आहे की काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रेल्वे गाड्या थांबत नसल्याने हिवरखेडसह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी इतर स्थानकांचा आधार घ्यावा लागत आहे.
हिवरखेड हे संत्रा उत्पादक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. परिसरात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने रेल्वे स्थानकाला विशेष महत्त्व आहे. रेल्वे गाड्यांचे थांबे सुरू असल्यास परिसरातील नागरिकांना प्रवासाची सोय होण्यासोबतच व्यापारालाही चालना मिळू शकते. मात्र, रेल्वे थांबे बंद झाल्याने शेतकरी व व्यापारी वर्गालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.विशेष म्हणजे, हिवरखेड रेल्वे स्थानकावर केवळ हिवरखेड येथीलच नव्हे, तर हातुर्णा, तळेगाव, आष्टी, लोणी यांसह परिसरातील दूरवरच्या गावांमधून प्रवासी ये-जा करतात. तसेच जवळच असलेल्या प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्रीक्षेत्र सालबर्डी येथे दर्शनासाठी जाणार्या भाविकांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे या स्थानकाला सामाजिक, धार्मिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे.दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात वाढलेली झाडे झुडपे, पादचारी मार्गाची दूरवस्था,जिण्याच्या लोखंडी कठड्यांना आलेला गंज तसेच इमारतीची झालेली अवस्था यामुळे स्थानकाच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रवाशांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. रेल्वे गाड्यांचे थांबे बंद झाल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि भाविक अशा सर्वच घटकांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना इतर स्थानकांवर जाण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे हिवरखेड रेल्वे स्थानकाचे महत्त्व लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालण्याची गरज
हिवरखेड रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे रेल्वे गाड्यांचे थांबे तातडीने सुरू करावेत, स्थानक परिसराची स्वच्छता व दुरुस्ती करावी आणि प्रवाशांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी हिवरखेड सह परिसरातील नागरिकांकडून होत आहे. आता रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे कधी लक्ष देणार, तसेच हिवरखेड रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्या पुन्हा कधी थांबणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





