जरुड ते बहादा या मार्गावर कारचालकांना बिबटचे दर्शन
कालवडीलाही केले ठार : उपाययोजना करण्याची मागणी

वरुड/25 नोव्हेंबर – जरुड ते बहादा या मार्गावरील स्मशानभूमीजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शेतशिवारात शेतीची कामे करण्यासाठी जाणार्या शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, या परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. दरम्यान काल रात्रीच्या सुमारास जरुड शिवारातील विश्वास गोडसे यांच्या मालकीच्या कालवडीला सुध्दा या बिबटने ठार केल्याचे शेतकर्यांचे म्हणणे असून वनविभागाने तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. जरुड-बहादा मार्गालगत मोठ्या प्रमाणात शेती असून, या परिसरातून शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांची नियमित ये-जा सुरू असते. सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरापर्यंत अनेक शेतकरी शेतातील कामांसाठी या मार्गाचा वापर करतात. अशातच स्मशानभूमीजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती मिळाल्याने शेतकर्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला
बिबट्याच्या दर्शना मुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये; मात्र आवश्यक ती खबरदारी घ्यावी, शेतकर्यांनी शेतात जाताना एकट्याने जाणे टाळावे, विशेषतः पहाटे व रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा, त्याला हुसकावून लावण्याचा किंवा पाठलाग करण्याचा प्रयत्न करु नये. तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत भुजाडे यांनी केले आहे.





