4.22 लाख एसटी प्रवाशांची खासगी कंपनीकडे माहिती

प्रवाशांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेबाबत चिंता

आधार, भ्रमणध्वनी क्रमांक, पत्त्याची माहिती कंपनीकडे

अमरावती/24 नोव्हेंबर : एसटी महामंडळाच्या सवलतीच्या दरात प्रवास करणार्‍या 4.22 लाखांहून अधिक प्रवाशांची वैयक्तिक माहिती खासगी कंपनीकडे असल्याने माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यभरातील स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम एबिक्स कंपनीला देण्यात आले असून, अमरावती जिल्ह्यातील लाखो प्रवाशांची आधारकार्ड क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक आणि घराचा पत्ता यांसारखी महत्त्वाची माहिती या प्रक्रियेत जमा करण्यात आली आहे. दरम्यान, एबिक्स कंपनीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.
एसटी महामंडळाने जुलै 2025 पासून सवलतीच्या दरात प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी संपूर्ण राज्यात राष्ट्रीय सामाजिक प्रवासी कार्ड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत स्मार्ट कार्ड तयार करून देण्याचे काम राज्यस्तरीय कंत्राट एबिक्स लिमिटेड कंपनीला देण्यात आले. कंपनीच्या वितरण शाखेमार्फत एबिक्स पेमेंट सर्व्हिसेस आणि एनएसडीएल पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून ऑगस्ट 2026 पर्यंत अमरावती जिल्ह्यात कार्ड नोंदणीचे काम सुरू आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण 4 लाख 74 हजार 593 प्रवाशांची नोंदणी झाली असून, त्यापैकी 4 लाख 22 हजार 661 प्रवाशांना स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये 42 हजार 743 ज्येष्ठ नागरिक, 3 लाख 24 हजार 622 महिला, 47 हजार 34 ज्येष्ठ नागरिक योजनेचे लाभार्थी आणि 8 हजार 262 इतर प्रवाशांचा समावेश आहे.
दुसरीकडे, देशभरात चर्चेत असलेल्या महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासात संबंधित कंपनीच्या व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. विकास नगरशी संबंधित एबिक्स कंपनीला एसटी महामंडळाकडून सुमारे 140 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्रवाशांची वैयक्तिक माहिती नेमकी कोणाच्या ताब्यात आहे, तिचा वापर कशासाठी होतो आणि तिच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रवाशांची माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी निश्चित करून तिच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Back to top button