अमरावतीत चोरट्यांचा धुमाकूळ; पाच दुकाने फोडली

अवघ्या 15 मिनिटांत 1 लाख 52 हजारांची रोकड लंपास

पोलीस ठाण्याजवळच चार चोरट्यांची धाडसी चोरी

अमरावती/20 नोव्हेंबर– शहरात चोरट्यांनी पोलिसांच्या गस्तीला आव्हान देत एकाच रात्री 5 दुकाने फोडल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. कोतवाली पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या रचना व्यापारी संकुल आणि मनपा बाजारपेठेत चार जणांच्या टोळीने अवघ्या 10 ते 15 मिनिटांत धुमाकूळ घालत 4 दुकानांमधून 1 लाख 52 हजार रुपयांची रोकड लंपास केली. पाचव्या दुकानात चोरीचा प्रयत्न करण्यातआला. विशेष म्हणजे दुकानांतील दागिने, कपडे आणि महागड्या वस्तूंना हात न लावता चोरट्यांनी केवळ गल्ल्यांमधील पैशांवर डल्ला मारला. संपूर्ण घटना परिसरातील चित्रण यंत्रणेत कैद झाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संकुलात 4 सुरक्षा रक्षक तैनात असतानाही त्यांना चोरीची चाहूल लागली नसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शुक्रवारी पहाटे 3.56 वाजता चार जणांची टोळी रचना व्यापारी संकुलात पोहोचली. दोघे बाहेर लक्ष ठेवून होते, तर दोघांनी दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश केला. अंकित पशुवैद्यकीय औषधालयातून किशोर पुरुषोत्तम चिटोरे (66) यांच्या दुकानातील 25 हजार रुपये, तर मंगळधाम वसाहतीतील आशीष येखंडे (40) यांच्या एकवीरा पशुवैद्यकीय औषधालयातून 92 हजार रुपये चोरले. त्यानंतर पुणे येथील अयुब शेख यांच्या मालकीच्या ऑन यू कपड्यांच्या दुकानातून 10 हजार रुपये लंपास केले. दुकानाचे व्यवस्थापक अभिराज पुरुषोत्तम काळे (23), रा. धामणगाव रेल्वे, यांचे दुकानही चोरट्यांनी फोडले. यानंतर मनपा बाजारपेठेतील राजस्थान चौधरी लॉजसमोरील दुकान क्रमांक 36 मधील दीपक श्रीचंद लुल्ला यांच्या सोनी ज्वेलर्समधून 25 हजार रुपये चोरले. दुसर्‍या गल्ल्यातील 10 हजार रुपये मात्र बचावले. आणखी एका दागिन्यांच्या दुकानात चोरीचा प्रयत्न फसला. सकाळी 8 वाजता चोरी उघडकीस आल्यानंतर ठाणेदार रोशन सिरसाट, पोलीस अधिकारी उदापूरे, हेड कॉन्स्टेबल घनश्याम यादव यांनी घटनास्थळी पाहणी केली. न्यायवैद्यक पथकाने पुरावे गोळा केले. गुन्हे शाखाही तपासात सहभागी झाली असून, टोळी परराज्यातील असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 (अ) आणि 331 (4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button