कारच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू
पतीला 400 मीटर फरफटत नेले

* गाड्यांच्या रेसमध्ये निष्पापांचा बळी
बीड/20 नोव्हेंबर – रस्त्यावर गाड्यांची शर्यत (रेस) लावण्याचा जीवघेणा थरार एका निष्पाप शेतकरी दाम्पत्याच्या जीवावर बेतल्याची संतापजनक घटना माजलगाव शहराजवळ आज, शुक्रवारी (दि. 20) दुपारी 4 वाजता घडली आहे. माजलगाव शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या डक पेट्रोल पंपासमोर समोरून भरधाव वेगाने आलेल्या क्रेटा कारने दुचाकीवरील पती-पत्नीला जोरदार धडक. कारने तब्बल 400 मीटर फरफटत नेल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी पत्नीची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. वाहनांच्या रेसमुळे निष्पाप पती-पत्नीचा मृत्यू झाल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण माजलगाव तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, माजलगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून दोन चारचाकी वाहनांची भररस्त्यात रेस लागली होती आणि ही वाहने अत्यंत बेदरकार व भरधाव वेगाने धावत होती. दरम्यान, मंगरूळ नं. 3 येथील प्रल्हाद श्रीमंत गायकवाड (वय 50) आणि त्यांची पत्नी सुनिता प्रल्हाद गायकवाड (वय 45) हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक चक 20 नझ 6085) केसापुरी वसाहतीच्या पुढे असलेल्या डक पेट्रोल पंपासमोरून माजलगाव शहराकडे येत होते. त्याचवेळी समोरून वार्याच्या वेगाने आलेल्या क्रेटा कारने (क्रमांक चक 44 अऊ 5141) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. क्रेटा कारचा वेग इतका प्रचंड होता की धडकेनंतर गाडीने प्रल्हाद गायकवाड यांना तब्बल 400 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. यामध्ये त्यांच्या चेहर्याचा चेंदामेंदा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या पत्नी सुनिता गायकवाड यांना तात्काळ माजलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र जबर मार लागल्याने सायंकाळी 6 वाजता उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. धडक दिल्यानंतर क्रेटा कार चालक घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत होता; परंतु जोरदार धडकेमुळे गाडीच्या एअरबॅग बाहेर पडल्याने गाडी जागेवरच थांबवावी लागली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.





