आडनदी जलविद्युत प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी परवानगी

वृक्षतोड, वनजमीन वळती नसल्याचे वनविभागाचे स्पष्टीकरण

अमरावती/20 नोव्हेंबर : मेळघाट प्रादेशिक वनविभाग, परतवाडा अंतर्गत घटांग वनपरिक्षेत्रातील आडनदी येथे प्रस्तावित ’अदानी पंप स्टोरेज हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट’साठी केवळ प्राथमिक सर्वेक्षण व भू-तांत्रिक तपासणीपुरती परवानगी देण्यात आली असून, कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यास परवानगी दिलेली नाही, तसेच अद्याप वनजमीन वळती करण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आडनदी येथील प्रस्तावित प्रकल्प क्षेत्रातील वनस्पती व प्राण्यांचे सर्वेक्षण तसेच जिओ-टेक्निकल इन्व्हेस्टीगेशनसाठी 24 ठिकाणी बोअरहोल घेण्याकरीता ’अदानी हायड्रो एनर्जी टेन लिमिटेड’कडून परवानगी मागण्यात आली होती.
वन (संरक्षण एवं संवर्धन) अधिनियम 1980 आणि वन (संरक्षण एवं संवर्धन) नियम 2023 मधील मार्गदर्शक तत्त्वानुसार या सर्वेक्षणाला परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीमध्ये झाडे तोडण्यास कोणतीही मुभा दिलेली नाही. तसेच प्रकल्पासाठी अद्याप कोणतीही वनजमीन वळती करण्यात आलेली नाही. तसेच वन (संरक्षण एवं संवर्धन) अधिनियम 1980 अंतर्गत वनजमीन वळती करण्याचा प्रस्तावही अद्याप प्राप्त झालेला नाही, असे सहायक वनसंरक्षक (कॅम्पा व वन्यजीव) घटांग योगेश तापस यांनी कळविले आहे.

Back to top button