पत्रकारितेच्या नावाखाली खंडणीचे रॅकेट
मध्यप्रदेशातून सुरू होते

गँगच्या चार प्रमूख महिलांसह 39 जणींना अटक
भोपाळमधून गुलाबी गँग जेरबंद; आठ राज्यातील हजारो सरपंचांकडे खंडणीची मागणी
नागपूर /17 नोव्हेंबर : पत्रकारितेचा गैरवापर चालवत देशातील आठ राज्यांतील सरपंचांना टार्गेट करून त्यांच्याकडून लाखोंची खंडणी उकळणार्या गुलाबी गँगचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी छडा लावला. या गँगच्या चार प्रमूख महिलांसह 39 जणींना पोलिसांनी अटक केली. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या घटनेची माहिती मंगळवारी, 17 नोव्हेंबर रोजी पत्रकारांना दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक अनिल मस्के उपस्थित होते.
‘दैनिक श्रेष्ठ न्यूज’च्या नावाखाली भोपाळमधून खंडणीचे हे रॅकेट चालविले जात होते. मोनिका लालसिंग सूर्यवंशी (28, रा. बगची, छतरी चौराहा, नरसिंहगढ, जि. राजगढ मध्यप्रदेश), नेहा लालसिंग सूर्यवंशी (23, रा. नरसिंहगढ, जि. राजगढ), अक्षरा मिलिंद अरक (21, रा. हुजूर, भोपाळ) आणि कोमल मोहन मोरे (23, रा. अन्नानगर, भोपाळ) अशी या रॅकेटमधील प्रमूख महिलांची नावे आहेत. त्यातील मोनिका आणि नेहा या दोघी या गुलाबी गँगच्या म्होरक्या असल्याची प्राथमिक माहिती आहे.
असा चालत होता ‘धमक्यां’चा कारभार
देशभरातील विविध राज्यात ग्रामपंचायतीत विकासकामासाठी चालविल्या जाणार्या सरकारी योजनांची माहिती ’महापंचायत पोर्टल’ च्या माध्यमातून मिळवायची. कोणत्या ग्रामपंचायतीला कोण सरपंच आहे, त्याचा नंबर काय, ते मिळवून या गँगमधील 35 महिला उपरोक्त कर्मचारी प्रत्येक सरपंचांना फोन करून जाहिरातीच्या नावाने पैशांची मागणी करायच्या. पैसे न दिल्यास ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार प्रसिद्ध करून बदनामी करण्याची धमकी द्यायच्या. त्यांनी अशा प्रकारे नागपूर जिल्ह्यातील सरपंच मीना सुरेशसिंग सूर्यवंशी यांना 11 ऑगस्ट ते 6 नोव्हेंबर या कालावधीत एका महिलेने ‘दैनिक श्रेष्ठ न्यूज’ची प्रतिनिधी असल्याचे सांगून जाहिरातीसाठी तीन हजार रुपयांची मागणी केली. ऑनलाइन पैसे पाठविण्यासाठी क्यूआर कोडही दिला. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर विरोधात बातमी छापू, अशी धमकी दिली. याशिवाय जुनोना फुके येथील सरपंच प्रभा गोतमारे यांच्याकडून अशाच पद्धतीने ऑनलाइन 500 रुपये स्वीकारले. दुसर्या अनेक महिला सरपंचांनाही बातमी छापण्याची धमकी देऊन खंडणी उकळली होती.





