नागपूरमध्ये 7 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा आदेश

विधानसभा व विधानपरिषदेच्या बैठकांची वेळ निश्चित

मुंबई /17 नोव्हेंबर – राज्याच्या विधिमंडळाचे आगामी हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून उपराजधानी नागपूर येथे सुरू होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी घटनेतील अधिकाराचा वापर करून याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या महत्त्वपूर्ण अधिवेशनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून दोन्ही सभागृहांच्या कामकाजाच्या वेळाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र शासन राजपत्रात यासंदर्भातील विशेष अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. राजपत्रातील नोंदीनुसार, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भारताच्या घटनेतील कलम 174 मधील खंड 1 नुसार मिळालेल्या अधिकाराचा वापर केला आहे. या अधिकारांतर्गत त्यांनी सोमवार, दिनांक 7 डिसेंबर 2026 रोजी नागपूर येथील विधान भवनात महाराष्ट्र विधानसभेची आणि महाराष्ट्रविधानपरिषदेची बैठक बोलावली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात आतापासूनच चांगलीच लगबग सुरू झाली आहे.
विधानसभेचे कामकाज सोमवार, 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. यासंदर्भातील आदेश महाराष्ट्र विधानसभेचे सचिव जितेंद्र भोळे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे, महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक त्याच दिवशी म्हणजेच 7 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता भरवण्यात येणार आहे. विधानपरिषदेच्या बैठकीचे आदेश सचिव डॉ. विलास आठवले यांनी प्रसिद्ध केले आहेत. दोन्ही सभागृहांचे कामकाज एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळेत सुरू होणार असल्याने प्रशासकीय पातळीवर मोठी तयारी केली जात आहे.
दरवर्षी हिवाळी अधिवेशनानिमित्त संपूर्ण राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा नागपुरात दाखल होते. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या अधिवेशनात प्रामुख्याने मांडले जातात. यंदाही नागपूरच्या विधान भवनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार असल्याने हे अधिवेशन चांगलेच गाजण्याची चिन्हे आहेत. राजपत्रात आदेश प्रसिद्ध होताच नागपूर येथील विधान भवन परिसरात साफसफाई आणि दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. मुंबईतील विधान भवन सचिवालयाकडून सर्व आमदारांना आणि संबंधित विभागांना या बैठकीची माहिती कळवण्यात आली आहे.
बॉक्स अधिवेशन अधिसूचनेची महत्त्वाची शासकीय माहिती व तपशील -महाराष्ट्र शासन राजपत्रात 29 ऑक्टोबर 2026 रोजी ही अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. विधानसभा बैठकीचा आदेश क्रमांक 18223 असून विधानपरिषदेचा आदेश क्रमांक 18224 असा आहे. मुंबई येथील बँकबे रेक्लेमेशन भागातील विधान भवन सचिवालयातून ही माहिती जारी झाली. शासकीय मुद्रणालयाच्या संचालिका मनीषा कुंभार यांनी या राजपत्राचे प्रकाशन केले असून या अंकाची किंमत 4 रुपये आहे.

Back to top button