ड्रोनद्वारे व्हिडीओ काढणार्‍या तरुणावर प्राणघातक हल्ला

रमाकांत गावंडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न

मुख्याधिकार्‍यांचे नोटिसीवर जिल्हाधिकार्‍यांना लेखी स्पष्टीकरण
जिल्हाधिकार्‍यांकडे कारवाईसाठी भाजपाची आक्रमक मागणी
शिंदे गटाकडून आरोपांचे जोरदार खंडन

अमरावती/17 नोव्हेंबर  – नगरपरिषदेच्या गच्चीवर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी रात्रीच्या अंधारात झोडलेल्या मटणाच्या मेजवानीने शहराचे राजकारण चांगलेच तापले आहे. या मेजवानीची ड्रोनद्वारे चित्रफीत काढणारे रमाकांत नरेंद्र गावंडे (पाटील) यांच्यावर अज्ञात 10 ते 12 जणांनी जीवघेणा हल्ला चढवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर भाजपाने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे धाव घेत मुख्याधिकारी पराग वानखडे आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली असून शिंदे गटाने मात्र हे केवळ साधे स्नेहभोजन असल्याचा दावा करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या गच्चीवर ही कथित मेजवानी रंगली होती. मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्या वाढदिवसाचे निमित्त व दोन अधिकार्‍यांच्या झालेल्या नद्वारे व्हिडीओ काढणार्‍या …
बदल्या व काही सेवावृत्ती झालेले कर्मचारी यांना मेजवानी म्हणून अधिकारी, कर्मचारी यांनी या ठिकाणी मटणाचा बेत टाकला होता त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा शहरात रंगली होती. या संपूर्ण मेजवानीचे ड्रोन यंत्राच्या मदतीने चित्रीकरण करण्यात आले आणि ही चित्रफीत समाजमाध्यमांवर वार्‍यासारखी पसरली. ज्या गच्चीवर दरवर्षी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ध्वजारोहणाचा पवित्र शासकीय सोहळा पार पडतो त्याच जागेचा खासगी मेजवानीसाठी वापर झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे शहरातील अनेक भागांत 8 दिवस कचरा उचलणारी गाडी फिरकत नसल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असताना दुसरीकडे प्रशासनाच्या या अशा वागण्यामुळे कारभाराच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या मेजवानीच्या चित्रफितीवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच आता या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. 16 डिसेंबरच्या रात्री 11 वाजताच्या सुमारास अमरावती येथून निवेदन देऊन परत आल्यानंतर प्रशांत कॉलनी येथील रहिवासी रमाकांत नरेंद्र गावंडे (पाटील) यांच्यावर 10 ते 12 अज्ञात जणांनी अचानक प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात रमाकांत गावंडे गंभीर जखमी झाले असून सुरुवातीला त्यांच्या वडिलांना या प्रकाराची कोणतीही कल्पना नव्हती. मात्र 17 नोव्हेंबर रोजी मुलगा बेपत्ता असल्याने त्यांनी शोधाशोध केली असता रमाकांत हे अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने वडिलांनी त्यांना तातडीने अमरावती येथील घ्यालगजी या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी वडिलांनी 17 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मुलावर जीवघेणा हल्ला झाल्याचे त्यात नमूद केले आहे. तक्रारीची दखल घेत मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले हे जखमी तरुणाचा जबाब आणि वैद्यकीय अहवाल घेण्यासाठी अमरावतीकडे रवाना झाले असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरले आहे. भाजपाचे आ. उमेश यावलकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. नगरपरिषद हे शहरासाठी लोकशाहीचे मंदिर असते आणि अशा पवित्र वास्तूवर मटणाची मेजवानी करणे अत्यंत चुकीचे असल्याची टीका आ. उमेश यावलकर यांनी केली. विशेष म्हणजे ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती आणि याचेही भान संबंधितांना राहिले नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्या कारभाराची यापूर्वीच शासनाकडे तक्रार केली असून या घटनेमुळे मोर्शी शहराची राज्यभर मोठी बदनामी झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाच्या या आरोपांना शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ही कोणतीही राजकीय मेजवानी नसून अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकार्‍यांचे केवळ साधे स्नेहभोजन होते असा दावा त्यांनी केला आहे. नगराध्यक्ष शिंदे गटाचे असल्यामुळे आणि आम्ही त्यांच्यासोबत असल्याने केवळ राजकारण करून आम्हाला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे असे शिंदे गटाच्या नगरसेवकांनी म्हटले आहे. यापूर्वी भाजपाच्या महिला व बालकल्याण सभापतींनीही नगरपरिषदेच्या आवारात 200 ते 250 लोकांच्या जेवणाचा मोठा कार्यक्रम घेतला होता मात्र त्यावर आम्ही कधीही टीका केली नाही अशी आठवणही त्यांनी करून दिली. प्रशासनाच्या कामात अडथळा आणण्यासाठीच विरोधकांनी या साध्या जेवणावळीचे भांडवल केल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मुख्याधिकारी पराग वानखडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून आता प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शासकीय निधीचा वापर नसल्याचा ठाम दावा -जिल्हाधिकार्‍यांनी बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला मुख्याधिकारी पराग वानखडे यांनी लेखी उत्तर सादर केले आहे. या कार्यक्रमासाठी अधिकारी आणि पदाधिकार्‍यांनी स्वतःच्या खिशातून पैसे जमा करून खर्च केला असून यात 1 रुपयाही सरकारी निधी वापरलेला नाही. तसेच गच्चीवर कोणत्याही प्रकारचे मद्यपान झाले नसून हे केवळ स्नेहभोजन होते असा ठाम दावा त्यांनी लेखी खुलाशात केला आहे.
कायद्याच्या कचाट्यात प्रशासन अडकण्याची दाट शक्यता- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 77 नुसार मुख्याधिकार्‍यांवर प्रशासनाच्या देखरेखीची आणि कर्मचार्‍यांवर नियंत्रणाची जबाबदारी असते. तसेच कलम 78-क नुसार कर्तव्यामध्ये जाणीवपूर्वक कसूर किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि नगर प्रशासन संचालनालयाच्या चौकशीत दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना
मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 16/11/2026 रोजी रात्री रमाकांत नरेंद्र गावंडे (वय 38 वर्षे, रा. प्रशांत कॉलनी, मोर्शी) यांना काही व्यक्तींनी जबरदस्तीने सोबत नेऊन नशीदपूर फाट्याजवळ मारहाण केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.प्रथमदर्शनी सदर मारहाण हाताबुक्क्यांनी केल्याचे दिसून येत असून, तक्रारीतील इतर बाबींची पडताळणी व सखोल चौकशी सुरू आहे. तक्रारदार सध्या अमरावती येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून, आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. नागरिकांना आवाहन: सदर घटनेबाबत कोणतीही अप्रमाणित किंवा चुकीची माहिती तसेच अफवा सोशल मीडिया, व्हॉट्सप किंवा इतर माध्यमांतून प्रसारित करू नयेत.

कारवाईसाठी आक्रमक भूमिका आणि सुरक्षेची मागणी
प्रशासनाच्या चुकीच्या कामांविरुद्ध गेल्या दोन वर्षांपासून मी प्रामाणिकपणे लढा देत आहे. माझा कोणाशीही राजकीय किंवा वैयक्तिक वाद नाही. मात्र, मटणाच्या मेजवानीविरोधात तक्रार दिल्यानेच गावातील गुंडांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सर्व आरोपींकडून माझ्यासोबतच नगरसेवक व सहकार्‍यांच्या जीवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. हुकूमशाही थांबवून संविधानानुसार जगण्याचा अधिकार मिळावा तसेच शासनाने आपल्याला तात्काळ पोलीस संरक्षण देऊन जीविताची शाश्वती द्यावी, अशी जोरदार मागणी मी शासनाकडे करीत आहे.
रमाकांत नरेंद्र गावंडे (पाटील), प्रशांत कॉलनी, मोर्शी

Back to top button