फिरोझ बाली वर दुसर्यांदा एमपीडीए अंतर्गत कारवाई
1 वर्षासाठी अमरावतीच्या तुरुंगात रवानगी

अमरावती/16 नोव्हेंबर – शहरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलले असून, नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुन्हेगार फिरोज काझी ऊर्फ बाली जहीरोद्दीन काझी (34) याच्यावर दुसर्यांदा महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार त्याला 1 वर्षासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्याच्यावर अशाच प्रकारची कारवाई झाली होती. मात्र, कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याच्या गुन्हेगारी कारवाया पुन्हा सुरू झाल्याने पोलिसांनी ही कठोर कारवाई केली. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इकबाल कॉलनी येथे राहणार्या फिरोज काझी याच्याविरुद्ध 2021 पासून चालू वर्षापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांचीगंभीर दखल घेत पोलिसांनी 2024 मध्ये पहिल्यांदा एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करून त्याची कारागृहात रवानगी केली होती. मात्र, या कारवाईला आव्हान देत त्याने न्यायालयात दाद मागितली आणि कारागृहातून बाहेर पडण्यात यश मिळवले. त्यानंतरही त्याच्याविरुद्ध आणखी 7 गुन्हे दाखल झाले. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पुन्हा कठोर कारवाईचे निर्देश दिले. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके आणि नागपुरी गेटचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक विकास मनपिया यांच्या पथकाने प्रस्ताव तयार केला. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर फिरोज काझी याला ताब्यात घेऊन अमरावती मध्यवर्ती कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आले. वारंवार गुन्हे करणार्यांवर पोलिसांचा वचक-फिरोज काझी याच्याविरुद्ध 2021 पासून एकूण 12 गुन्हे दाखल झाले आहेत. 2024 मध्ये पहिली स्थानबद्धतेची कारवाई झाली. मात्र, कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याच्याविरुद्ध पुन्हा 7 गुन्ह्यांची नोंद झाली. त्यामुळे पोलिसांनी दुसर्यांदा कठोर पाऊल उचलले. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी अशा सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.





